रात्रीच्या वेळी टॅक्सी शोधत रस्त्यावर फिरणे, टॅक्सी बुक केल्यास ती येण्याची वाट पाहत थांबणे हे प्रवाशांसाठी, विशेषत: महिला प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. सध्याचे वातावरण पाहता महिला तर टॅक्सीमध्ये बसायलाही घाबरत आहेत. त्यात वेळही जातो आणि एकटय़ा महिलेला रात्री रस्त्यावर थांबणेही धोकादायक असू शकते. मात्र यासाठी आता केवळ एक मिस कॉल केला तर तुमच्याकडे येणाऱ्या टॅक्सीची इत्थंभूत माहिती मिळत राहील. ही टॅक्सी वेळेत तर येईलच; परंतु किती वेळात ही टॅक्सी पोहोचणार आहे, टॅक्सीचा चालक कोण, तिचा मार्ग काय आणि ती कशी येत आहे, हे सारे एसएमएस द्वारे प्रवाशांना कळणार आहे. ‘ओलाकॅब्स’ या कंपनीने ही अभिनव योजना सुरू केली असून संपूर्ण भारतातली ही अशा प्रकारची पहिलीच सेवा असल्याचा दावा केला आहे.
याबाबत बोलतांना ओलाकॅबचे संचालक भाविन अग्रवाल यांनी सांगिले की, सध्याच्या वातावरणामुळे महिला प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. मुंबईच्या महिला रात्री बेरात्री कामानिमित्त बाहेर पडतात. त्यांना टॅक्सीची गरज लागते. अनोळखी टॅक्सीचालक त्यांना धोकादायक वाटतो. अशा महिलांनी आमच्या कॉल सेंटरला फोन केला तर १५ मिनिटात त्यांना टॅक्सी मिळेल. त्यांनी एखादी खासगी टॅक्सी बुक केली तर ती येईपर्यत तिची वाट पहात रस्त्यावर थांबावे लागते. आमच्याकडे टॅक्सी बुक केल्यावर त्याने फक्त एक मिस कॉल द्यायचा. मग त्या प्रवाशाला टॅक्सी कुठून निघाली आहे, चालक कोण आहे, ती किती वेळापर्यत तुमच्याकडे पोहोचेल याची माहिती एसएमएसद्वारे येत राहील. त्यामुळे आता प्रवाशांना टॅक्सीसाठी घर किंवा ऑफिसच्या बाहेर येऊन रस्त्यावर थांबावे लागणार नाही. आमची टॅक्सी प्रवाशांना त्यांच्यापर्यत किती वेळात पोहोचेल याची अचूक माहिती देत राहील, असे अग्रवाल यांनी सांगितले. तुमची टॅक्सी दारात आली आहे, असा मेसेज येईल मग खाली उतरा अशी ही पद्धत आहे. जर प्रवाशाकडे स्मार्ट फोन असेल तर एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करून त्या प्रवाशाला संपूर्ण प्रवास, टॅक्सी कुठून जात आहे ते सतत मोबाईलवर दिसत राहील.
  ओलाकॅब्समध्ये जीपीआरएस सिस्टिम आहे. त्यामुळे संपूर्ण टॅक्सीचा मार्ग कॉल सेंटरमध्येही दिसत राहतो. त्यामुळे या टॅक्सीतले महिला किंवा इतर प्रवासी सुरक्षित राहतील, असा दावाही अग्रवाल यांनी केला. आमच्याकडे सर्व चालक नोंदणीकृत असून त्यांची पाश्र्वभूमी माहीत असलेले व सुशिक्षित आहेत. पण महिला प्रवाशांची मागणी लक्षात घेता माहिला चालक नेमण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.