आजारपण, क्रीडा किंवा इतर अशैक्षणिक उपक्रमांमुळे परीक्षा हुकलेल्या पदवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुढच्या वीस दिवसांत फेरपरीक्षा घेण्याची मुंबई विद्यापीठाची पद्धती अवघ्या दोन वर्षांतच इतिहासजमा होणार आहे. कारण या संधीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे आढळून आल्याने २०१३पासून सुरू असलेली ही सोय रद्दबातल करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. त्याऐवजी आधीच्या एटीकेटी नियमानुसार एखाद्या विषयाची परीक्षा हुकल्यास पुढच्या सत्रापर्यंत वाट पाहण्याशिवाय विद्यार्थ्यांकडे गत्यंतर नसेल.
आजारपण, क्रीडा किंवा इतर अशैक्षणिक उपक्रमांमुळे पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षांच्या सत्र परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांकरिता दुसरी संधी म्हणून महाविद्यालयांनी पुढील २० दिवसांमध्ये फेरपरीक्षा घ्यावी असा नियम दोन वर्षांपूर्वी श्रेणी पद्धती लागू करताना विद्यापीठाने घेतला होता. या परीक्षेचा निकाल सर्व विद्यार्थ्यांसमवेतच जाहीर केला जात असे. परंतु या नियमाचा काही विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे आढळून आल्याने विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने हा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात या पद्धतीला शिक्षकांकडूनही विरोध होत होताच. कारण अवघ्या २० दिवसांमध्ये परीक्षांचे आयोजन आणि नियोजन शिक्षकांना करावे लागायचे. या सततच्या परीक्षांचा अतिरिक्त ताण येत असल्याची तक्रार शिक्षकांकडून करण्यात येत होती.
फेरपरीक्षेची संधी अपरिहार्य कारणांमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांकरिता करण्यात आली होती. मात्र एखाद्या विषयाची तयारी झाली नाही म्हणून किंवा अन्य कारणांमुळे काही विद्यार्थी परीक्षा देण्याचेच टाळू लागले. म्हणजे सहा विषय असतील तर त्यातील पाच, चार किंवा तीनच विषयांची परीक्षा द्यायची आणि उर्वरित विषय फेरपरीक्षेदरम्यान द्यायचे, असे प्रकार घडू लागले. फेरपरीक्षेमुळे ऑक्टोबर आणि मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांना विद्यार्थी महत्त्व देऊ न लागल्याने हा नियमच रद्द करण्याचे विद्यापीठाने ठरविले आहे.
हा नियम रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असले तरी शिक्षक आणि महाविद्यालयांनी मात्र सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. कारण वारंवार परीक्षांचे आयोजन करावे लागत असल्याने त्यांचा अतिरिक्त ताण व्यवस्थेवर येत होता. मूल्यांकनाच्या कामावरही त्याचा परिणाम होत असे. म्हणून शिक्षकांकडून तर या फेरपरीक्षांना विरोधच होत होता.