दुर्मीळ व घरगुती अशा १५० हून अधिक पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची आणि हे पक्षी प्रत्यक्ष पाहण्याची संधी ‘वर्ल्ड ऑफ विंग्ज’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. आयत्या जोडून आलेल्या सुट्टीचा फायदा घेत तमाम मुंबईकरांनी या प्रदर्शनासाठी गर्दी केली आहे. चिमुकल्यांनी तर या पक्ष्यांसोबत तसेच तेथे असलेल्या आकर्षक माशांसोबत सेल्फीज काढण्याची संधी सोडलेली नाही. पक्षी आणि माशांचे हे प्रदर्शन ५ मेपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत रुईया महाविद्यालय, माटुंगा येथे खुले असणार आहे. या प्रदर्शनात आफ्रिकन गोल्डन ब्रीस्टेड फिंच, आफ्रिकन गे पॅरोट, अ‍ॅमेझोन पॅरोट, गोल्डन फिसंट, हंस मकाव, ग्रीन विंग मकाव, मंडारिन, रोसेल्ला बर्ड, स्कार्लेट मकाऊ, झेब्रा फिंच, क्व्ॉकर पॅरोट आणि अशा प्रकारचे अन्य दुर्मीळ पक्षी ठेवण्यात आले आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना तसेच प्रेक्षकांना पक्ष्यांबद्दलची सविस्तर माहिती दिली जात असल्यामुळे विद्यार्थी प्रदर्शनाचा मनसोक्त आनंद घेत आहेत. या प्रदर्शनाचे आयोजक लोकिक सोमण यांनी केले असून, प्रदर्शन भरविण्यासाठी अ‍ॅनिमल वेल्फअर बोर्ड ऑफ इंडियाची परवानगीही मिळाली आहे.