दरवर्षी पावसाच्या तडाख्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे मुंबईकरांना नवीन नाहीत. मात्र गेल्या वर्षी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १८०० कोटी रुपयांची कामे प्रशासनाने सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या अनुमतीने कंत्राटदारांना दिली. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यात तरी गुळगुळीत रस्त्यांवरुन जाता येईल, असा मुंबईकरांचा समज होता. परंतु मुसळधार पावसाच्या तडाख्यात यंदाही रस्त्यांची चाळण झाली आणि मुंबईकरांचा भ्रमनिरास झाला. पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने सात परिमंडळांमध्ये सात कंत्राटदारांची नियुक्ती केली असून त्यांना एकूण ३४.१० कोटी रुपयांची कंत्राटे दिली आहेत. परंतु मुंबईत पडलेले खड्डे ना पालिका अधिकाऱ्यांना दिसत आहेत ना नगरसेवक आणि कंत्राटदारांना. मुंबईतील अनेक चौकांची आज दैना उडाली आहे. चौकात बसविलेले पेवरब्लॉक पहिल्याच पावसात उखडले आणि रस्त्यात मोठी डबकी तयार झाली. काही ठिकाणी डांबरी रस्त्यावरील खड्डा बुजविण्यासाठी गेल्या वर्षी पेवरब्लॉकचा वापर करण्यात आला होता. आता त्यातील पेवरब्लॉक वाहून गेले असून पुन्हा रस्त्याला खिंडारे पडली आहेत. केवळ रस्तेच नव्हे तर पदपथांवरील पेवरब्लॉक उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. तर पादचाऱ्यांना त्यातूनच वाट काढत चालावे लागत लागत आहे. मुंबईत ठिकठिकाणच्या खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. वाहनांना इंचभर पुढे सरकण्यासाठीदेखील बराच वेळ लागत आहे. पण करदात्या मुंबईकरांच्या पैशांतून वेतन घेणारे पालिका अधिकारी-कर्मचारी आणि मुंबईकरांच्या मतांवर निवडून येणाऱ्या नगरसेवकांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही.