पावसाळ्यापूर्वी नाल्यांतून काढण्यात येणाऱ्या गाळाची विल्हेवाट लावणे ही मुंबई पालिका प्रशासनाची दरवर्षीची मोठी डोकेदुखी असते. यंदा मात्र ती कमी होण्याची चिन्हे आहेत. या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने नामी शक्कल लढवली आहे. मुंबईच्या आसपासच्या बहुतांश डोंगरांमध्ये दगडखाणी खणण्यात आल्या आहेत. परिणामी या डोंगरांमध्ये प्रचंड खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात पाणी साठून राहण्याव्यतिरिक्त या खड्डय़ांचा काही उपयोग नाही. उलट त्यांचा धोकाच आहे. मुंबईच्या नाल्यांमधील गाळ टाकण्यासाठी यंदा याच दगडखाणींचा उपयोग करण्यात येणार आहे. मुंबईत दरवर्षी १ एप्रिलपासून नालेसफाईस सुरुवात होते. पूर्वी नाल्यांतील गाळ, क्षेपणभूमीमध्ये (डम्पिंग ग्राऊंड) टाकण्यात येत असे. मुंबईत दररोज सुमारे ६५०० टन कचरा आणि २५०० टन गाळ व दगडमाती असा ९००० टन घनकचरा निर्माण होतो. त्याची विल्हेवाट लावतालावता प्रशासनाची पुरेवाट होते. त्यात पावसाळापूर्व नालेसफाईच्या गाळाची भर पडते. मुंबईतील क्षेपणभूमींची कचराग्रहण क्षमता आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे या गाळाचे करायचे काय, असा यक्षप्रश्न पालिकेला गेल्या काही वर्षांपासून भेडसावत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी नालेसफाईची कामे देताना गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारीही प्रशासनाने कंत्राटदारांवर टाकली होती. गाळ कुठे टाकायचा हे तुमचे तुम्ही बघा, असे सांगत प्रशासनाने हात वर केले होते. त्यावेळी कंत्राटदारांनी गाळ कुठे टाकला हे गुलदस्त्यातच आहे. जमीन मालकाची परवानगी घेऊन कंत्राटदारांनी नाल्यांतील गाळ खाजण भूमीत टाकल्याचा दावा वारंवार प्रशासन करीत होते. प्रत्यक्षात मुंबईबाहेर जाणाऱ्या महामार्गालगत अनेक ठिकाणी गाळकचऱ्याचे ढिग पडलेले दिसून आले होते. या पाश्र्वभूमीवर गाळ टाकण्यासाठी वर्षभरात कंत्राटदारांनी दगड खाणींचा माग घेत तेथील खड्डे हेरून ठेवले आहेत. यंदा लहान-मोठय़ा नाल्यांतून तब्बल चार लाख घनमीटर कचरा व गाळ उपसला जाईल, असा अंदाज पालिकेचे संचालक (अभियंत्रिकी सेवा व प्रकल्प) लक्ष्मण व्हटकर यांनी व्यक्त केला आहे. कंत्राटदारांनी गाळ टाकण्यासाठी ठाणे, नवी मुंबई आणि महाडच्या आसपासच्या दगड खाणी निवडल्या आहेत. दगड खाणी आडवाटेला आणि वस्तीपासून दूर आहेत. त्यामुळे तेथे गाळ टाकणे सगळ्यांनाच सोयीचे आहे. कंत्राटदारांनी त्यासाठी संबंधित खाण मालक आणि जमीन मालकांची परवानगी घेतली आहे. या उपायामुळे दगड खाणींमधील धोकादायक खड्डे बुजतील, नाल्यांतील गाळ टाकण्याचा प्रश्न सुटेल आणि ओसाड ठिकाणी असलेल्या खाणीमध्ये गाळ टाकल्याने दरुगधीमुळे मनुष्यवस्त्यांमधील आरोग्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही, असे लक्ष्मण व्हटकर यांनी सांगितले.