डोंबिवलीतील प्रवाशांच्या सेवेसाठी माजी खासदार राम कापसे यांच्या प्रयत्नाने १९ वर्षांपूर्वी डोंबिवली लोकल सुरू झाली. डोंबिवलीकर प्रवासी त्यामुळे सुखावले. धक्काबुक्की खात मुंबईला जाण्यापेक्षा आपल्या डोंबिवली लोकलमध्ये बसून जाऊ अशी भावना आतापर्यंत डोंबिवलीकर प्रवाशांमध्ये होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग धुळीस मिळाला असल्याची प्रतिक्रिया नियमित डोंबिवली लोकलने मुंबईला प्रवास करणारे प्रवासी व्यक्त करीत आहेत. 

दिवा येथे मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत मात्र दिवा रेल्वे स्थानकात मुंबईला जाताना किंवा येताना प्रवाशांच्या झुंडीच्या झुंडी उतरताना दिसत आहेत. मुंबईतील बहुतेक कामगार, घरेलू कामगार दिव्यात राहण्यास आले आहेत. संध्याकाळी पाचनंतर मुंबईहून येणारी कोणतीही लोकल असो, दिव्याला ही लोकल पूर्ण खाली होते. यापूर्वी मुंबईहून येणाऱ्या डोंबिवली लोकलमध्ये किमान उभे राहण्यास जागा असायची. आता ही लोकल मुंबईहूनच खच्चून भरून येते आणि दिव्याला पूर्ण खाली होते. या गर्दीमुळे मधल्या रेल्वे स्थानकातील डोंबिवलीतील प्रवाशांना अनेक वेळा गाडीत चढता येत नाही, असे प्रवासी सांगतात.
मुंब्रा, दिवा आणि कोपरच्या प्रवाशांना सकाळच्या वेळेत मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढण्यास वाव नसतो. या तिन्ही रेल्वे स्थानकांवरील बहुतेक प्रवासी डाऊन डोंबिवली लोकलने डोंबिवली रेल्वे स्थानकात येतात आणि आरामात परतीचा प्रवास सुरू करतात. त्यामुळे लोकलच्या प्रतीक्षेत असलेला, आरामात जाऊ, उभे राहून जाऊ अशी गणिते करीत असलेला प्रवासी डोंबिवली रेल्वे स्थानकातच गाडीतील गर्दीमुळे खाली राहत आहे, अशा प्रतिक्रिया डोंबिवलीकर प्रवाशांकडून देण्यात येत आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिव्यासाठी स्वतंत्र लोकल सुरू करण्याचा विचार करावा. डोंबिवली लोकलमधील त्यांचे अतिक्रमण कमी होईल यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही प्रयत्न करावेत अशा प्रवाशांच्या मागण्या आहेत.