ठाणे, कळवा आणि मुंब्रा परिसरात कोकेन या अमली पदार्थाप्रमाणे दिसणाऱ्या ‘एमडी’ या नशेच्या पावडरची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंब्रा पोलिसांनी विशेष पथकाची निर्मिती केली असून त्यांच्यामार्फत मोकळी मैदाने, पडीक जागा, शाळा आणि महाविद्यालये परिसरात नजर ठेवण्यात येत आहे. याशिवाय, तरुणाईने या नशेच्या आहारी जाऊ नये, यासाठी शाळा, महाविद्यालये आणि मुंब्य्रात ठिकठिकाणी नागरिकांच्या मदतीने या नशेच्या पावडरच्या दुष्परिमाणांविषयी जनजागृती करत आहेत.
ठाणे, कळवा, मुंब्रा आणि कल्याण शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात ‘एमडी’ या नशेच्या पावडरची विक्री करणारी मोठी टोळी कार्यरत झाली आहे.  शीतपेयातून किंवा नाकावाटे या पावडरचे सेवन करण्यात येते आणि तिच्या नशेचा अंमल बराच काळ राहतो. या पावडरच्या सेवनामुळे सहा महिन्यांत ४० किलोंपर्यंत वजन घटते. त्यामुळे ही पावडर जीवघेणी ठरू शकते. मात्र, अमली पदार्थाच्या यादीत या पावडरचा समावेश नसल्यामुळे पोलीसही कारवाई करण्यासाठी पुढे येत नव्हते. अखेर मुंब्य्रातील नागरिक या पावडर विक्रेत्यांना पकडून चोप देऊ लागले. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या मुंब्रा पोलिसांनी या पावडर विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू केली आणि या नशेच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईसाठी नागरिकांच्या मदतीने जनजागृती मोहीम हाती घेतली. दोन दिवसांपूवी मुंब्रा पोलीस ठाण्यात एका बैठकीत उपस्थित नागरिकांना पोलीस उपायुक्त प्रभाकर बुधवंत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास मुंडे यांनी ‘एमडी’ पावडरसह अमली पदार्थाच्या दुष्परिणामांविषयी माहिती दिली. अशा पदार्थाची विक्री आणि सेवन करणाऱ्यांविषयी माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. यंदाच्या वर्षांत मुंब्रा पोलिसांनी नार्कोटिस कायद्यान्वये २५ ते ३० आरोपींना अटक केल्याची माहितीही त्यांनी दिली.
पोलिसांची जनजागृती मोहीम..
मुंब्रा पोलिसांनी ‘एमडी’ पावडर आणि अमली पदार्थविरोधातील कारवाईसोबतच जनजागृती मोहीम हाती घेतली असून त्यामध्ये या व्यसनांच्या आहारी तरुणाईने जाऊ नये, यासाठी पोलीस अधिकारी नागरिकांच्या मदतीने बैठका घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. त्यात एमडी पावडर आणि अमली पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी माहिती देण्यात येत आहे. विशेषत: शाळा, महाविद्यालये आणि मुंब्य्रात ठिकठिकाणी बैठका घेण्यात येत आहेत. मुंब्रा परिसरातील सिम्बॉयसिस स्कूल, अमृतनगर दर्गा हॉल, शंकर मंदिर मैदान, रत्ना बिल्डिंग, बॉम्बे कॉलनी, साने हॉल चाँदनगर, श्रीलंका-रशीद कंपाउंड आदी ठिकाणी अशा प्रकारच्या बैठका आतापर्यंत घेण्यात आल्या आहेत. विशेष पथकामार्फत चाँदनगर मैदान, अमिनाबाग, रशीद कंपाउंड भागातील अमली पदार्थाचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.  पथकामार्फत मोकळी मैदाने, पडीक जागा, शाळा आणि महाविद्यालये परिसरात सतत गस्त सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास मुंडे यांनी दिली. या व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी मुंब््रयातील वैद्यकीय संघटनेची मदत घेतली जात आहे. याशिवाय समाजातील प्रतिष्ठितांना या अमली पदार्थाविरोधात जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.