पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना बाधा झाल्यामुळे सुगंधी दुधाचा पुरवठा बंद केल्यानंतर पौष्टिक आहार म्हणून चिक्की देण्याची तयारी पालिका प्रशासनाने दर्शविली. मात्र प्रशासनाच्या अनागोंदीमुळे अद्यापही विद्यार्थ्यांच्या मुखी चिक्की पडलेली नाही, अशी टीका करीत नगरसेवकांनी बुधवारी अतिरिक्त आयुक्तांना फैलावर घेतले.
पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार म्हणून सुगंधी दुधाचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र काही विद्यार्थ्यांना बाधा झाल्यामुळे तो बंद करण्यात आला. विद्यार्थ्यांना दुधाऐवजी चिक्की देण्याची मागणी नगरसेवकांकडून वारंवार करण्यात येत होती. अखेर प्रशासनाने चिक्की देण्याची तयारी दर्शविली. मात्र या चिक्कीवर पालिकेचा शिक्का असावा असा आग्रह अतिरिक्त आयुक्तांनी धरला. परिणामी चिक्कीचा पुरवठा करण्यासाठी कुणीच पुढे आले नाही. त्यामुळे आजतागायत विद्यार्थ्यांना चिक्की मिळू शकलेली नाही. शिवसेनेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी हा प्रश्न स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत उपस्थित केल्यानंतर सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली.
चिक्कीवर पालिकेचा ठसा असावा, असा आग्रह प्रशासनाने विनाकारण धरला. त्यामुळेच विद्यार्थ्यांना आजपर्यंत चिक्की मिळू शकलेली नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी यावेळी केला. तृष्णा विश्वासराव यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ाला पाठिंबा देत विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनीही विद्यार्थ्यांना तात्काळ चिक्कीचा पुरवठा करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांना चिक्कीचा पुरवठा करण्याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा आणि पुढील बैठकीत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रशासनाला दिले.