शहरात मोठय़ा प्रमाणावर वाढणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांचे सामान परस्पर गायब करण्याच्या घटनादेखील घडत असून अतिक्रण विभागातील कर्मचारी आणि फेरीवाल्यांच्या संगनमताने हे प्रमाण वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी अतिक्रणविरोधी पथकातील कर्मचारी फेरावाल्यांकडून तासाला वीस रुपये हप्ता घेत असल्याची बाब उघडकीस आली आहे.
नवी मुंबईतील पदपथ, मुख्य रस्ते अलीकडे फेरीवाल्यांनी व्यापून टाकल्याचे दिसून येते. वाशी, ऐरोली, नेरुळ, कोपरखैरणे येथे रेल्वे स्थानकांपासून निघणारे रस्ते हे या फेरीवाल्यांनी फुलून गेल्याचे दृश्य आहे. केंद्र सरकारने फेरीवाला धोरण तयार करण्याचे ठरविल्यापासून हे प्रमाण शेकडो पटीने वाढले आहे. याचे पडसाद गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत उमटले. अनेक नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात वाढणाऱ्या फेरीवाल्यांबद्दल चिंता व्यक्त केली. काही वर्षांपूर्वी केवळ दोन हजार फेरीवाले असलेली ही संख्या आता लाखाच्या घरात गेली आहे. त्यामुळे जिकडेतिकडे फेरीवाल्यांचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून येत आहे. तरी पालिका कोणतीच कारवाई करीत नाही. त्यात आता आठवडा बाजार नावाची संकल्पना आली असून आठवडय़ातील एक दिवस एका मोकळ्या ठिकाणी हजारो फेरीवाले ठाण मांडून बसत आहेत. स्थानिक नगरसेवकासाठी ही पर्वणी झाली असून प्रत्येक फेरीवाल्याकडून दोन ते पाचशे रुपये हप्ता घेतला जात आहे. यात प्रभाग अधिकारी व अतिक्रणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांचा हिस्सादेखील ठेवला जात आहे. फेरीवाले आणि या पथकातील कर्मचारी यांच्या संगनमताने हे प्रमाण वाढत असून हे कर्मचारी तासाला वीस रुपये फेरीवाल्यांकडून घेत असल्याचा आरोप परवानाधारक फेरीवाल्यांनी केला आहे. नाण्याच्या या एका बाजूबरोबरच फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई केल्यास त्यांचे सामान परत दिले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. फेरीवाल्यांकडून जप्त केलेले सामान हे डंपिंग ग्राउंडवर जमा केले जात असून तेथील सुरक्षा रक्षक लाच घेऊन हे सामान देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही सामान हे कर्मचारी व सुरक्षा रक्षक गायब करीत असल्याची तक्रार फेरीवाल्यांच्या नेत्यांकडे आलेली आहे. तुर्भे येथे असा आठवडा बाजार भरतो तेथे जप्त केलेले चांगले सामन हे कर्मचारी घरी घेऊन जात असल्याची बाब नगरसेवक नामदेव भगत यांनी सांगितली. नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत आजच्या घडीस चालण्यासाठी पदपथ मोकळे राहिलेले नाहीत. त्यावर फेरीवाल्यांचे प्रमाण वाढले असून याला प्रभाग अधिकारी जबाबदार आहेत. प्रभाग कार्यालयाच्या समोर फेरीवाल्यांची जत्रा भरत असल्याचे वाशी येथील दृश्य आहे.

नवी मुंबईत वाढलेल्या बेकायदेशीर फेरावाल्यांसाठी प्रभाग अधिकारी जबाबदार असून प्रभाग कार्यालयालाच टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. चेंबूर, गोवंडी, मुंब्रा या शहराबाहेरील भागांतील फेरीवाले यांचा मोठा सहभाग असून अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचारी कारवाईपूर्वी मोबाइलवर संर्पक साधून या फेरीवाल्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती देत आहेत. त्यासाठी ते तासाला वीस रुपये हप्ता घेत असून यात प्रभाग अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. सर्वसामान्य व वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा अधिकृत फेरीवाल्यांना पालिकेने व्यवस्था करून देण्याची आवश्यकता आहे.
प्रफुल्ल म्हात्रे, अध्यक्ष, नवी मुंबई हॉकर्स युनियन