पालिका कामगारांच्या ‘काम बंद’ आंदोलनात शुक्रवापासून अत्यावश्यक पाणी पुरवठा व आरोग्य सेवेचे कर्मचारीही सहभागी झाल्याने शहराची पाणी वितरण व आरोग्य व्यवस्था संपूर्णपणे कोलमडली आहे. नागरिकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. महिन्यातून एकदा होणारा पाणीपुरवठा आणि डेंग्युसदृश्य रोगांची लागण शहरात असताना हे नवे संकट उभे राहिल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
तुंबलेल्या गटारी व सर्वत्र कचऱ्याचा ढीग यामुळे मनमाडकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावठाण भागात तब्बल २६ दिवसानंतर पाणी पुरवठा करण्याचा दिवस असतानाही पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली पालिका कर्मचाऱ्यांचे सलग चौथ्या दिवशी धरणे आंदोलन सुरू होते. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस संघटनेचे आरोग्य विभागाचे कर्मचारीही पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांबरोबर संपात सहभागी झाल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या संपामुळे नागरिकांची कमालीची गैरसोय होत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. अत्यावश्यक सेवाही सुरू करणार नाही असा संपकरी कर्मचाऱ्यांनी द्वारसभेत निर्धार व्यक्त केला.