आर्थिक देवघेवीच्या कारणातून यंत्रमाग कारखानदार संजय बाबगोंडा पाटील यांचा सोमवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योग बंद ठेवण्यात आला होता. यंत्रमाग कामगारांच्या अंगावरील थकबाकीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी अंत्यविधीवेळी करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पाटील यांच्या खूनप्रकरणातील तिघा आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती तपास अधिकारी, सहायक पोलीस अधीक्षक चैतन्य एस. यांनी दिली.    
३० जानेवारी रोजी मनोज गट्टाणी या राजस्थानी यंत्रमागाचा खंडणीसाठी खून करण्यात आला होता.त्याचे पडसाद ताजे असतांनाच सोमवारी रात्री संजय पाटील (वय ४५ गुरूकृपानगर) या यंत्रमागधारकाचा कारखान्यातील आर्थिक देवघेवीच्या कारणातून जुना चंदूर रस्ता परिसरात धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. ही घटना समजल्यावर तेथे यंत्रमागधारकांची मोठी गर्दी झाली होती. आर्थिक प्रश्नातून यंत्रमागधारकांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी शहरातील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी शहरातील यंत्रमाग उद्योग बंद ठेवण्यात आला होता. आज संजय पाटील यांच्या पार्थिवावर लिंगायत स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, माजी नगरसेवक सागर चाळके,जागृती यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, शटललेस पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष गोरखनाथ सावंत आदींनी श्रध्दांजली वाहिली. यंत्रमाग कामगारांच्या अंगावरील थकबाकीचा विषय गंभीर बनत चालला आहे. कामगार नेते थकबाकी बुडविण्याची चिथावणी देत आहेत. त्यातून यंत्रमागधारक व कामगार यांच्यात संघर्ष निर्माण झाला असून त्याची परिणती संजय पाटील यांच्या खुनामध्ये झाली आहे. त्यामुळे थकबाकीबाबत निश्चित धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.