एपीएमसी येथील ट्रक टर्मिनल जवळ शुक्रवारी उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये चालकाचा मृतदेह आढळून आला होता. यात चालकाचा गळा दाबून खून करण्यात आले असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी त्या ट्रकचा क्लिनरला अटक केली असून त्यानेच हा खून केल्याची कबुली दिली आहे.
सुरूवाती पैश्यासाठी हा खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज होता. मात्र चालकाने आरोपीजवळील पैसे हिसकावून घेतल्याने हा खून केल्याचे सांगितले आहे. मात्र त्याच्याकडे असलेल्या पिशवीत मानवी हाडे, कवटी, पक्षांची पिसे, पक्षाची चोची, देवीच्या मुर्ती, तावीज, झाडाची पाने आदी साहित्य त्याच्या जवळ आढळून आले आहेत. तसेच हत्या झाली त्या दिवशी अमावस्या असल्याने ही हत्या आहे कि नरबळी या सभ्रंमात पोलिस यंत्रणा पडली आहे.
संतोष शिरसाठ असे या मृत ट्रकचालकाचे नाव आहे. शुक्रवारी शिरसाठ मृत अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता. या घटनेचा अधिक तपास करीत असताना सदर ट्रकमध्ये माल असलेल्या घाटकोपर येथे पोलिस पोहचले. त्या ठिकाणी असलेल्या सिसिटिव्ही कॅमेऱ्यामध्ये संतोष यांच्या सोबत क्लिनर राकेश उर्फ राजेश रामावत सिंग हा आढळून आला होता. यामुळे पोलिसांनी सिसिटिव्हीतील फुटेजच्या आधारे क्लिनरचे छायाचित्र तयार करून शोध सुरू केला होता. शनिवारी राकेश नेरूळ येथील एलपी पुलाखाली झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्याकडे अधिक तपास केला असता शिरसाठ याने त्याच्याकडील सहाशे रूपये हिसकावून घेतले होते. यामुळे शुक्रवारी दारूच्या नशेत असलेल्या शिरसाठ याचे हात पाय बांधत त्याने गळा आवळून खून केला असल्याची कबुली त्याने दिली असल्याची माहिती परिमंडळ एकच पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली आहे.
सिंग याच्या जवळील पिशवीत पिशवीत मानवी हाडे, कवटी, पक्षांची पिसे, पक्षाची चोची, देवीच्या मुर्ती, तावीज, झाडाची पाने आदी साहित्य त्याच्या जवळ आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. या खूनामागे आणखी काही कारण आहे याचा अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिरसाठ याच्या शवविच्छेदन अहवालात शिरसाठ याचा गळा आवळल्या बरोबरच त्याच्या डोक्याची कवटी फॅक्चर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सिंग याच्याकडे मिळालेल्या साहित्यामुळे या खूना मागे जादूटोणा तर नाहीना याचा शोध पोलिस घेत आहे.