गेल्या चार दशकांहून अधिक काळ यमुनेच्या तिरी दिमाखात उभ्या असणाऱ्या आणि आधुनिक भारताची जगातील एक मुख्य ओळख ठरलेल्या आग्रा येथील ताजमहालाविषयी सर्वसामान्य व्यक्तींच्या मनात बरेच कुतुहल आहे. मोगल बादशाह शहाजहान याने त्याची राणी मुमताज हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेली ही भव्य इमारत प्रेमाची प्रतीक मानली जाते. देशभरातील प्रेमिक ताजमहालाला साक्षी ठेवून एकमेकांवरील प्रेमाच्या आणाभाका घेतात. जगभरातील एक प्रमुख आश्चर्य मानली जाणारी ही भव्य वास्तू देशोदेशीच्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. असे असले तरी पौर्णिमेच्या चांदण्यात उजळून निघणाऱ्या या संगमरवरी वास्तूविषयी प्रचलीत लोकप्रवाद आणि दंतकथांमुळे बऱ्याच प्रमाणात गूढही आहे. आता ज्येष्ठ प्राच्य विद्या अभ्यासक डॉ. दाऊद दळवी यांनी तब्बल १५ वर्षे संशोधन करून लिहिलेल्या ‘भारतातील मुस्लिम स्थापत्य कला’ या ग्रंथाने हे गूढ उकलणार आहे. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये हे संशोधन प्रसिद्ध होणार असले तरी पहिल्यांदा ते मराठीत येत आहे. ग्रंथालीच्या वाचकदिन समारंभात २५ डिसेंबरला या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
मुमताजची आठवण म्हणून जगात कुठेही नसेल, असे भव्य स्मारक शहाजहानला उभारायचे होते. त्यासाठी कुराणातील जन्नतच्या (स्वर्ग) वर्णनाबरहुकुम उद्यानांमध्ये ही वास्तू उभारण्यात आली. त्यासाठी राजस्थानमधील मकरानच्या खाणींमधून उच्च प्रतीचा संगमरवर आणण्यात आला. ‘ताजमहाल’च्या दृष्टिक्षेपात अन्य दुसरी कोणतीही वास्तू नको म्हणून आजूबाजूच्या जागाही विकत घेण्याची दूरदृष्टी त्यावेळी शहाजहान याने दाखवली. ताजमहालचे बांधकाम म्हणजे तत्कालिन स्थापत्यकलेचा परमोच्च बिंदू आहे. तत्कालिन ऐतिसाहिक दस्तऐवज आणि कागदपत्रांचा अभ्यास करून वास्तूंचे वैशिष्टय़ विषद करण्यात आले आहे.  या ग्रंथामुळे ताजमहालाभोवती असलेल्या दंतकथा आणि गूढतेचे वलय दूर होईल, अशी अपेक्षा डॉ. दाऊद दळवी यांनी व्यक्त केली आहे.