सायन-पनवेल महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे २८ किलोमीटरचे अंतर अवघा तीस मिनिटांमध्ये पार करणे वाहनचालकांना शक्य झाले आहे. मात्र या सुसाट मार्गावर अपघातांचे सत्रदेखील सुरू असल्याने पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. यातच गेल्या चार दिवसांमध्ये खारघर व कामोठे येथे या मार्गालगत भुयारी मार्गाच्या कामासाठी केलेल्या खोदकामांमध्ये दोन बेवारस मृतदेह सापडले आहेत.  कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना कंत्राटदाराने न केल्याने सुसाट मार्गाखाली बेवारस मृतदेह दबल्याचे बोलले जात आहे. दोन्ही मृतदेह बेवारस असल्याने त्यांना भिकारी ठरवून कंत्राटदाराला पोलिसांकडून क्लीनचिट देण्याची शक्यता वर्तविली जाते.  खारघर व कामोठे एमजीएम रुग्णालयासमोर भुयारी पादचारी मार्ग करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने केलेले खोदकाम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या खोदकामांच्या खड्डय़ांमध्ये पाणी साचले आहे. सध्या या खड्डय़ाची ओळख परिसरात जीवघेणा खड्डा म्हणून केला जात आहे. टोलवसुलीला लाल कंदील मिळाल्यामुळे  कामोठे उड्डाणपुलाजवळून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गाचे काम ठप्प झाल्याचे दिसते. खारघर येथे सापडलेला मृतदेह हा भिकाऱ्याचा असल्याचा पोलिसांना संशय आहे. खारघरच्या खड्डय़ावर चार दिवस उलटूनही पत्रे बसविण्यात आले नव्हते. तशीच परिस्थिती कामोठे येथील आहे.
शवविच्छेदनाच्या अहवालानंतर तपासाची पुढील दिशा ठरेल. वेळ पडल्यास पोलीसच फिर्यादी होऊन तक्रार दाखल करतील. तसेच कंत्राटदाराने सुरक्षेची उपाययोजना राबविली नसल्यास त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल.  
– श्रीराम मुल्लेमवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कामोठे
सायन-पनवेल टोलवेज कंपनीचे सध्या कोणतेही काम सुरू नाही. त्यामुळे आमचा या अपघातांशी काहीही संबंध नाही.
– उमेश सोनावणे, प्रवक्ता, एसपीटीपीएल.