शहरातील कचरा नीट उचलल्या जात नसून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग असल्याबद्दल  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नाराजी व्यक्त करीत महापालिकेला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच खामला चौकातील संचयिनी कॉम्लेक्ससमोर सायंकाळी दारू आणि अंडी विकणारे हातठेले लावले जातात. याबद्दल प्रतापनगर पोलिसांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
पुनम प्राईड कान्डमिनीअमचे अध्यक्ष एस.सी. बेरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणीअंती न्या. वासंती नाईक आणि न्या. ए.एम. बदर यांच्या खंडपीठाने महापालिकेला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणी ९ जून रोजी निश्चित केली. याचिकाकर्त्यांनी खामला चौकातील संचयिनी कॉम्प्लेक्सच्या सभोवतालच्या रहिवाशांना होणाऱ्या त्रासकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. गेल्या आठ वर्षांपासून हे कॉम्प्लेस वापराविना पडून आहे. त्यात कचरा टाण्यात येत आहे. जणू ते कचरा घर झाले आहे. यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना दरुगधी येते. शिवाय या कॉम्प्लेसचा वापर असामाजिक तत्त्वांकडून होत आहे. या भागात सदैव अशा तत्त्वाचा वावर वाढला आहे. सायंकाळी कॉम्प्लेसच्या परिसरात दारू, अंडी आणि अन्य खाद्यपदार्थ विकले जातात. हे पदार्थ विकणाऱ्या हातठेलेवाल्यांचा हैदोसदेखील वाढला आहे. या सर्व गोष्टींमुळे या परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यासंदर्भात स्थानिक नगरसेवक, महापालिका अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच दारू विक्री आणि असामाजिक तत्त्वांचा परिसरातील वावर याबाबत प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. परंतु महापालिका आणि पोलिसांनी तक्रारी दखल घेतली नाही, असे याचिकाकर्त्यांचे वकील देवेन चौहान न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत शहरातील इतर ठिकाणाचे कचऱ्याचे ढीग आणि कचाऱ्यांची विल्हेवाट लागवण्यासंदर्भातील उपाययोजनांबाबत उत्तर दाखल करण्याचे निर्देश महापालिकेला दिले. तसेच याचिकाकर्त्यांने प्रतापनगर पोलिसांना याप्रकरणात प्रतिवादी करण्याची विनंती देखील मान्य केली. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी संचयिनी कॉम्प्लेक्स गैरवापर होत असल्याचे न्यायालयाला सांगितले. या भागात पडलेला कचरा आणि सायंकाळी हातठेले लागत असल्याचे छायाचित्र न्यायालयासमक्ष आणले. यावर न्यायालयाने शहरातील कचऱ्याचे ढीग कमी कसे करता येतील तसेच रिकाम्या असलेल्या इमारतींचा असमाजिक तत्त्वाकडून वापर कसा टाळता येईल. याबाबत सूचना देण्याचे याचिकाकर्त्यांला निर्देश दिले. न्यायालयाने याआधी देखील गांधी सागरातील कचरा आणि शहरात अनेक ठिकाणी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाबाबत संताप व्यक्त केला होता. याचिकाकर्त्यांचे अपार्टमेन्ट संचयिनी कॉम्प्लेक्सच्या समोर आहे. गेल्या आठवर्षांपासून हे कॉम्लेक्स रिकामे पडले आहे. त्यामुळे येथे कचरा टाकण्यात येत आहे.