नागपुरात प्रशिक्षण घेत असलेल्या आणि नोकरी करीत असलेल्या पोलिसांना शहरात नेमबाजीच्या सरावासाठी ‘फायरिंग रेंज’च उपलब्ध नसल्यामुळे त्यासाठी त्यांना भंडारा गाठावे लागत आहे.
मुंबईत २६/११/२००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांजवळ ‘एके ४७’ वा ‘एसएलआर’सारखी अत्याधुनिक शस्त्रे असली तरी ती चालविण्याचा सरावच नसल्याचे उघड झाले आहे. नागपुरात प्रशिक्षण घेत असलेल्या नवागत पोलिसांना तसेच नोकरीत असलेल्या पोलिसांना नेमबाजीच्या, गोळीबाराच्या सरावासाठी ‘फायरिंग रेंज’च उपलब्ध नाही. नागपूर शहरालगत हिंगणा येथे राज्य राखीव पोलीस दलाचा तळ आहे. मागील दहा-बारा वर्षांपासून या तळाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत हे अस्थायी ‘फायरिंग रेंज’ आहे. तेथे राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, शहर पोलीस, ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना नेमबाजीचा सराव करता येतो. मात्र, लांब अंतरासाठी सराव करायचा असेल तर भंडाऱ्याजवळील ‘फायरिंग रेंज’ गाठावे लागते.
प्रशिक्षणार्थी असो वा नोकरीतील अधिकारी वा शिपाई, या सर्वाना वर्षांतून किमान एकदा नेमबाजीचा सराव करावाच लागतो. मात्र, कमांडो वा खास प्रशिक्षित पथके याला अपवाद आहेत. त्यांना नित्य सराव करावाच लागतो. प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांनाही लांब अंतरासाठी सराव करायचा असेल तर भंडाऱ्याजवळील ‘फायरिंग रेंज’ला जावे लागते. नोकरीत असलेले पोलीस कायदा व सुव्यवस्था तसेच व्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी गुंतून राहतात. त्यामुळे त्यांना सरावासाठी वेळच नसतो. नागपुरात ‘फायरिंग रेंज’ उपलब्ध नसल्याची बाब पोलीस मुख्यालयापासून लपून राहिलेली नाही. सरावासाठी भंडारा येथे जावे लागत असले तरी तेथेही ताण आहेच. नागपुरातून तेथे जाण्यासाठी इंधन व इतर खर्चाचा बोजाही शासकीय तिजोरीवर पडत आहे. शहर व ग्रामीण पोलीस गोधनीजवळील भोसला मिलिट्री स्कूलच्या तळावरील रेंजची अधूनमधून मदत घेतात.
‘फायरिंग रेंज’साठी जागा विस्तीर्ण हवी. तो प्रामुख्याने डोंगराळ भाग असावा. जवळपास मनुष्यवस्ती नको. जंगली वा पाळीव प्राण्यांनाही धोका होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. शिवाय ती जागा सर्वात सुरक्षित हवी. या सर्व बाबींनी परिपूर्ण जागा ‘फायरिंग रेंज’साठी हवी. नागपुरातील काटोल मार्गावर असलेल्या पोलीस मुख्यालय परिसरात २००१ मध्ये भूमिगत कमी अंतराच्या ‘फायरिंग रेंज’चे भूमिपूजन झाले असल्याची माहिती आहे. मुंबईत राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक पाचच्या जागेवर अद्ययावत ‘फायरिंग रेंज’ पाच वर्षांपूर्वीच तयार करण्यात आले आहे.
‘स्किट रेंज’सह इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड, मल्टिगेट्स असे हे ‘फायरिंग रेंज’ असून तेथे दिवसा तसेच रात्रीही सराव करता येतो. देशातील बोटावर मोजण्याइतक्या ‘फायरिंग रेंज’पैकी ते एक तसेच राज्यातील एकमेव सुसज्ज ‘फायरिंग रेंज’ आहे. अद्ययावत ‘फायरिंग रेंज’ राज्यातील मराठवाडा, नागपूर तसेच नक्षलवादग्रस्त भागात तयार होणे ही काळाची गरज आहे.

नागपुरात आणखी एक अद्ययावत, सुसज्ज ‘फायरिंग रेंज’ची ही काळाची गरज आहे व हे खरेच आहे. सर्व बाबींनी परिपूर्ण जागा ‘फायरिंग रेंज’साठी हवी. त्यामुळे अशा जागेचा शोध घ्यावा लागेल. निधीही मोठा लागेल. सुरक्षेची बाब म्हणून शासनाने प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यायला हवा. यासंबंधी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.
कौशलकुमार पाठक, पोलीस आयुक्त