गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता अशी सगळी जमेची बाजू असूनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता मोदी सरकारच्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा होत असताना झाल्याचे दिसून येत नाही.
गडकरी यांनी नागपुरात पाच उड्डाण पूल बांधण्याची घोषणा केली होती. हे पूल सदर, कामठी, चिंचभवन, पारडी येथे उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. याशिवाय शहराच्या सभोवताल असलेले रिंग रोड संपूर्ण सिमेंटचे करण्यात येईल, अशी घोषणाही गडकरींची होती. वर्षभरात पाच उड्डाण पूल आणि सिमेंट रस्त्यांच्या कामाला हातही लावण्यात आलेला नाही.
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी गडकरी यांना पत्र लिहून या उड्डाण पुलांच्या कामांची आठवण करून दिली. महापालिका, जिल्हा परिषद आणि राज्यात सत्ता आल्यावर हे प्रकल्प सुरू होण्यास एक वर्षांचा कालावधी पुरेसा आहे. शिवाय नागपूरचे मुख्यमंत्री आहेत आणि केंद्रातील अडचणी सोडवण्यासाठी गडकरी आहेत. या सकारात्मक गोष्टी असताना नागपुरातील अनेक प्रकल्पांना अजूनही सुरुवात झालेली नाही.
नागपूरचे मुख्यमंत्री आणि केंद्रातील वजनदार नेते म्हणून ओळख असलेले गडकरी नागपूरचे असल्याने शहरवासीयांच्या प्रचंड अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु या नेत्यांनी घोषणांचा प्रचंड पाऊस पाडण्यातच वर्ष खर्ची घातले आहे. प्रत्यक्षात ठोस असे काही नागपूरकरांच्या वाटय़ाला आले नाही. प्रचंड आशावाद निर्माण करून सत्तेत गड सर केल्यानंतरही नागपुरात राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांची घोषणा करणे सुरू असून, नागपूरकरांना अद्यापही आशा आहे.
विदर्भाच्या महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पात अजूनही विदेशी गुंतवणूक झालेली नाही आणि रखडलेल्या या प्रकल्पाने भरारी घेतलेली नाही. आधीच मंजूर असलेल्या बोईंगच्या एमआरओ प्रकल्पाची केवळ चाचणी झाली. गडकरींची आखणी एक महत्त्वाकांक्षी योजना नाग नदीतून जलवाहतूक होय. या योजनेचे वर्षभरात काय झाले हे नागनदीच्या तीरावर राहणाऱ्यांना तरी कळले नाही.
स्वतंत्र राज्य विदर्भासाठी मोठा मुद्दा आहे. निवडणुकीआधी गडकरी यांनी तर चक्क लिखित आश्वासन दिले आहे मात्र, केंद्रात पोहोचल्याबरोबर त्यांना लिखित आश्वासन अस्पष्ट दिसू लागले आहे. स्वयंसेवी संघटनांना आश्वासन दिल्याचा विसर गडकरी यांना पडला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो रेल्वेचे उद्घाटन करताना या नेत्यांच्या समक्ष राज्याचे तुकडे होऊ देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली होती. यावर या नेत्यांनी मोदींचे वक्तव्य केवळ मुंबईपुरते होते, अशी मखलाशी केली.
एम्स, ट्रिपल आयटी राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांना जागा उपलब्ध करून देण्यात आली.
मेट्रो रेल्वेसाठी विदेशी गुंतवणूकदारांशी करार झाला नसला तरी भूसंपादन आणि भू-सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दोन जमेच्या बाजू सोडल्या तर नागपूरकरांच्या पदरी घोषणांशिवाय काहीच पडलेले नाही.
घोषणा लयभारी
– नागनदीतून जलवाहतूक
– पाच उड्डाण पूल
– रिंग रोड संपूर्ण सिमेंटचे
– स्वतंत्र विदर्भ

शहरातील पायाभूत सुविधांसाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ३३० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. अनेक थांबलेली कामे सुरू झाली आहेत. नागपूरच नव्हे तर ग्रामीण भागासाठी विकास निधी गडकरींनी आणला आहे.
गिरीश व्यास, प्रवक्ते भाजप