उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला लागून असलेल्या भिवापूरजवळ बिबटय़ाच्या कातडीसह आरोपीला अटक करण्यात आली आहे. मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, वन्यजीवप्रेमी विनित अरोरा व नागपूर वन विभागाच्या चमूने शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही कारवाई केली. गेल्या वर्षी याच अभयारण्यातून वाघाची शिकार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या बिबटय़ाची शिकारसुद्धा याच अभयारण्यातील असावी, अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अज्ञात स्वयंसेवी आणि त्यांच्या संस्थेने भिवापूर येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास बिबटय़ाच्या कातडय़ांचा सौदा होणार असल्याची माहिती कुंदन हाते यांना दिली.
या माहितीवरून लगेच तातडीने सापळा रचण्यात आला आणि वन विभागाचेच काही कर्मचारी ग्राहक बनून पाठविण्यात आले. आरोपी रणजितसिंग बिशनसिंग जुनी याने हे कातडे विक्रीसाठी आणले होते. त्याचा सहकारी असलेला भिवापूरचा रहिवासी श्रावण वाघमारे मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला.
नागपूर वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक आर.डी. खराबे, पारशिवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोसावी, देवलापारचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर. शेख,  तसेच सेमिनरी हिल्सचे तायडे, आझमी, मेश्राम यांनी चमू तयार केली. यातीलच एकजण बनावट ग्राहक बनून रणजितसिंग जुनी यांच्याकडे गेला आणि त्याचवेळी दबा धरून बसलेल्या या चमूने त्याला अटक केली. त्याच्याजवळ पूर्ण वाढ झालेले बिबटय़ाचे कातडे होते.
आरोपी रणजितसिंग जुनी याला प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केले असता त्याला वन कोठडी सुनावण्यात आली. बिबटय़ाची शिकार याच परिसरातील असल्याची मोघम माहिती आरोपीने दिल्याचे वन खात्याच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा वन खात्यासमोर शिकाऱ्यांचे आव्हान तयार झाले आहे.