पराभवाच्या छायेत वावरत असलेल्या राज्यातील आघाडी सरकारने महिनाभरापूर्वी नेमलेले पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना सध्या काय करू आणि काय नको करू, असे झाले आहे. उपराजधानीतील प्रत्येक समस्येवर मॅरेथान बैठका घेत निर्देशांचे बाण सोडणाऱ्या राऊतांमुळे प्रशासनाची दमछाक होत असली तरी सामान्य नागपूरकरांचे मात्र मनोरंजन होत आहे.
काँग्रेसचे विदर्भातील एकमेव दलित नेते अशी ओळख असलेले राऊत गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रिमंडळात आहेत. काँग्रेसच्या पालकमंत्र्यांविषयीच्या धोरणामुळे त्यांना आजवर नागपूरचे पालकत्व मिळू शकले नाही. याची खंत ते अनेकदा बोलून दाखवत. पक्षात किंवा सरकारमध्ये मनासारखे घडले नाही तर जाहीरपणे नाराज होण्याची सवय राऊतांना आधीपासून आहे. अशी नाराजी अनेकदा व्यक्त करूनही त्यांना नागपूरचे पालकत्व मिळत नव्हते. लोकसभेतील पानिपताने ही संधी चालून आली. पालकत्व मिळताच आता राऊत हर्षवायू झाल्यासारखे वागू लागले आहेत. प्रशासकीय पातळीवर उपराजधानीची सूत्रे हाती येताच राऊतांनी आढावा बैठका घेण्याचा सपाटाच सुरू केला आहे. गेल्या महिनाभरात त्यांनी ५० पेक्षा जास्त बैठका घेतल्या. मिहान ते रस्त्यावरील खड्डे असा या बैठकांचा प्रवास आहे. आता पालकत्व आल्यामुळे या शहराचे सर्व प्रश्न, समस्या चुटकीसरशी सोडवून दाखवीन असाच त्यांचा आविर्भाव सध्या दिसतो. या प्रत्येक बैठकांना पत्रकारांनी हजेरी लावावी, अशी त्यांची अपेक्षा असते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलणे, जे बोलले त्याला प्रसिद्धी मिळेल की नाही हे बघणे अशी सारी धावपळ राऊतांचा कर्मचारी वृंद करीत असतो. मध्ये तर राऊतांनी विक्रमच केला. एकाच दिवशी दोनदा त्यांच्या पत्रकार परिषदा झाल्या. माध्यमात झळकत राहिले तर शहरात काँग्रेसला सहज यश मिळेल, असा आत्मविश्वास राऊतांच्या वागण्यातून वारंवार दिसून येतो. राऊतांच्या हाती फार दिवस नाहीत. एवढय़ा अल्प कालावधीत दीर्घकाळ रेंगाळलेले प्रश्न सुटतील का, असा प्रश्न त्यांना पडत नाही. प्रश्न सोडविण्यासाठी मी किती झटत आहे हे त्यांना दाखवायचे आहे. माध्यमांनी केलेली नितीन विरुद्ध नितीन ही तुलना राऊतांना सुखावणारी आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून राऊत राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या पक्षाची सत्ता राज्यात आहे. या काळात ते मंत्री म्हणून या शहराचे अनेक प्रश्न सोडवू शकले असते. त्यासाठी पालकत्वच हवे असा आग्रह धरणे अनाठायी होते. मात्र, राऊतांनी ते केले नाही. आता संधी हातून जाण्याची वेळ आल्यावर ते निर्देशांचे बाण प्रशासनाच्या दिशेने सोडू लागले आहेत. या बाणांनी घायाळ कोण होणार हा खरा प्रश्न आहे. कारण अधिकाऱ्यांची जमात आता या बाणांना चांगलीच सरावली आहे. हे बघून राऊत मध्येच गरजतात. अधिकाऱ्यांनी ऐकले नाही तर कारवाई करू, असा इशारा देतात.
प्रशासकीय वर्तुळ याकडेही गंभीरपणे बघायला तयार नाही. हे ‘आऊटगोईंग’वाल्यांचे इशारे आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही अशा शब्दात या इशाऱ्यांची खिल्ली उडविली जात आहे. मुळात अशा सक्रियतेमुळे काँग्रेसला या शहरात पुन्हा यश मिळणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. खुद्द राऊतांच्या मतदारसंघात असंतोषाचे वारे जोरात वाहात आहेत. मुत्तेमवार, अहमद, चतुर्वेदी, ठाकरे या पराभूत नेत्यांशी त्यांचे पटत नाही. या सर्वाशी जुळवून घेण्याची तयारी राऊत दाखवत नाहीत. या प्रत्येक नेत्याची तोंडे वेगवेगळ्या दिशांना असताना अचानक राऊत सक्रियतेचा झेंडा खांद्यावर घेत भलत्याच दिशेला निघाले आहेत. सामान्य नागपूरकरांना रोज भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या, त्यांच्या मनात काँग्रेसविषयी राग का आहे. या राग व नाराजीची कारणे काय, ती कारणे शोधून त्यावर काही उपाय करता येईल काय, यासारख्या अनेक प्रश्नांकडे राऊत वळून बघायला तयार नाहीत. माध्यमातली सक्रियता वेगळी आणि सामान्यांची नाडी अचूक ओळखणे वेगळे, हे राऊतांना अजून उमगलेले नाही. टपरीवर चहा घेऊन अथवा रस्त्यावर पाणीपुरी खाऊन  ही नाडी पकडता येत नाही. त्यासाठी काय करावे लागते हे राऊत १५ वर्षांत विसरून गेले आहेत. कारण त्यांच्यातला कार्यकर्ता प्रस्थापित झाला आहे. तसा हा माणूस चांगला आहे. विदर्भाविषयी कळवळा असणारा आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिकडच्या दिग्गज मंत्र्यांशी भांडण करण्याची हिंमत दाखवणारा आहे, पण नुसती भांडणे करून काही होत नाही. विकासाच्या प्रश्नावर पाठपुरावा व सातत्य हवे असते. ते आता वेळ निघून गेल्यावर राऊत दाखवत आहेत. त्यामुळे त्यांची ‘सक्रियता एक्सप्रेस’ निवडणुकीनंतरच थांबेल अशी आशा बाळगून विरोधक शांत बसले आहेत. तर खड्डय़ांपायी त्रस्त असलेल्या नागपूरकरांचे मात्र मनोरंजन होत आहे.