पैशाअभावी गंभीर आजारावर उपचार करू न शकणाऱ्या गरीब रुग्णांना जनमंच ही सामाजिक संघटना आर्थिक मदत, तसेच निशुल्क औषधे उपलब्ध करून देत आहे. गेल्या वर्षभरात या संघटनेने अनेकांना जीवनदान देऊन आपल्या दातृत्वाचा परिचय करून दिला आहे.  
गंभीर विशेषत कर्करोगासारखा आजार म्हटले की मृत्यू बरा, पण औषधोपचार नको, अशी गरीब रुग्णांची मनोवस्था होते. महागडय़ा औषधोपचारांमुळे अनेक गरीब रुग्ण मृत्यूच्या दाढेत ढकलले जातात. अशा अत्यंत गरीब व गरजू रुग्णांना आर्थिक मदत आणि निशुल्क औषधे उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचावे, यासाठी जनमंचने गेल्या वर्षी १५ ऑगस्ट २०१३ रोजी ‘जनमंच जीवनदायी योजना’ सुरू केली. गेल्या वर्षभरात या योजनेद्वारे अनेकांचे अश्रू जनमंचने पुसले आहेत. साकोली येथील ४ वर्षे वयाच्या मोक्ष रमेश वलथरे या मुलीच्या हृदयाला छिद्र होते. जनमंचची माहिती मिळताच रमेश वलथरे यांनी नागपूर गाठून जनमंचच्या पदाधिकाऱ्यांना आपबिती सांगितली. सर्व सत्यता पडताळून पाहिल्यानंतर मोक्षच्या शस्त्रक्रियेसाठी जनमंचने १५ हजार रुपये दिले. कामठीतील सहा वर्षे वयाचा मोहंमद आयाम याला कर्करोग झाल्याचे कळताच त्याला २० हजाराची आर्थिक मदत केली. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्य़ातील तिरोडी येथील अर्चना दहेरवार (१२ वर्षे) या मुलीला रक्ताचा कर्करोग झाला आहे. तिच्या उपचारासाठी २० हजार रुपये उपलब्ध करून दिले. तात्या टोपे नगरातील गणेश मंदिरात जोगदेव पांडे (५५) हे पुजारी राहतात. त्यांना गुडघ्याचा त्रास होता. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया सांगितली. आर्थिक अडचणींमुळे ते शस्त्रक्रिया करू शकत नव्हते. जनमंचला ही माहिती मिळताच शस्त्रक्रियेसाठी त्यांनाही २५ हजार रुपयांची मदत केली. गेल्या वर्षभरात अशा अत्यंत गरीब रुग्णांना सुमारे एक लाखाहून अधिक रुपयांची मदत जनमंचने केलेली आहे.
वर्धा जिल्ह्य़ातील सेलू येथील समीर मारबते (१४), सुधा भांदककर यांना मधुमेह, मधु तुंबडे यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब आहे, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते दर महिन्याला औषधे घेऊ शकत नव्हते. या तिघांनाही जनमंच दर महिन्याला निशुल्क औषधे देत आहे. त्यात कुठलाही खंड पडलेला नाही. याशिवाय, आणखी तीन रुग्णांना निशुल्क औषधे देण्याचा निर्णय जनमंचने घेतला असल्याची माहिती जनमंच जीवनदायी योजनेचे संयोजक प्रल्हाद खरसने (पाटील) यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. याशिवाय, अनेक रुग्ण असे आहेत की, त्यांना काही विशिष्ट डॉक्टरांकडे उपचारासाठी पाठवण्यात येते. मेडिकलमधील कर्करोग विभाग प्रमुख डॉ. के.एम. कांबळे यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.  
गरीब रुग्णाला आम्ही शिधापत्रिका व विजेचे बिल मागतो. यावरून त्याची आर्थिक स्थिती कळते. काही संशय आल्यास आम्ही घरी जाऊन खातरजमा करून  पुढील निर्णय घेतो. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकालाच मदत करू शकू असेही नाही. डोळ्याची शस्त्रक्रिया करायची आहे, असे सांगून एक व्यक्ती मदत मागण्यासाठी आला. त्याचा आम्हाला संशय आला. त्याच्या घरी जेव्हा जनमंचचे पदाधिकारी गेले, तेव्हा त्याचेकडे दुमजली घर असून सांपत्तिक स्थिती उत्तम असल्याचे आढळून आले. त्यामुळे खात्री केल्यानंतरच मदत करत असल्याचे ते म्हणाले. जनमंचचे सदस्य दर महिन्याला शंभर ते दोनशे रुपये आर्थिक मदत करून ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीचा परिचय करून देत आहेत. जनमंचचे अध्यक्ष डॉ. अनिल किलोर, उपाध्यक्ष प्रमोद पांडे, जनमंच जेनेरिकचे संयोजक प्रभाकर खोंडे, श्रीकांत धवड यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू आहे.  
ही सर्व मदत देणगीवर अवलंबून आहे. समाजातील नोकरदार, उद्योगपती, वकील, अभियंते, डॉक्टर, व्यावसायिक आर्थिक मदत करून जनमंचच्या या उपक्रमात सहभागी होऊन हातभार लावत आहेत, परंतु वाढत्या मागणीनुसार ही देणगीही कमी पडत आहे. तेव्हा समाजातील दानशुरांनी या उपक्रमास हातभार लावावा, असे कळकळीचे आवाहन जनमंचचे अध्यक्ष डॉ. अनिल किलोर यांनी केले आहे.