हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात राज्यातील  सर्व आमदार, मंत्री आणि अधिकारी आहेत. आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी आपापल्या मतदारसंघात ते परत जातात. तसेच नाताळाच्या शाळांना सुटय़ा लागल्या आहेत. हीच संधी साधून विमानभाडे अनेकपटीने वाढून लुटीचे धोरण विमान कंपन्यांनी योजले आहे. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या विमानाचे भाडे शनिवारी २२ हजार रुपयांहून अधिक झाले आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरू आहे. हे अधिवेशन २४ डिसेंबपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाला शनिवारी आणि रविवारी सुटी आहे. त्यामुळे मंत्री, आमदार आपापल्या मतदारसंघात जाणार आहेत. यामुळे विमान वाहतूक कंपन्यांनी विमान भाडय़ात प्रचंड वाढ केली आहे. शुक्रवारी एअर इंडियाचे नागपूर ते मुंबई भाडे १५ हजार २०४ रुपये होते. जेट एअरवेजचे शनिवारचे नागपूर-मुंबई भाडे २२ हजार ११४ रुपये आहे. एअर इंडियाचे १९ हजार ३३३ रुपये भाडे आहे. शनिवार आणि रविवारी मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या विमानांचे भाडे सामान्य पेक्षा थोडे वाढले आहे. परंतु मुंबईहून सोमवारी नागपूरकडे निघणाऱ्या विमानाच्या भाडय़ात वाढ करण्यात आली आहे. सोमवारी मुंबईहून नागपूरकडे निघणाऱ्या विमानाचे भाडे १९ हजार ३३३ रुपये आकारण्यात येत आहे.
शनिवारी नागपूरहून पुण्याकडे उडणाऱ्या गो एअरवेजच्या विमानाचे भाडे १४ हजार ६११ रुपये आहे. रविवारचे पुण्याकरिताचे भाडे १० हजार ४१३ रुपये आहे. ऐरवी नागपूर ते पुण्याकरिता अडीत ते तीन हजार रुपये भाडे आकारले जाते. उन्ह्य़ाळ्यात, नाताळात, दिवाळीत आणि हिवाळी अधिवेशनाच्या काळात विमानाच्या भाडय़ातून प्रवाशांची लूट केली जात आहे.