यंदा बारावीच्या परीक्षेत सर्वच जिल्ह्य़ांच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्य़ाच्या टक्केवारीत झालेली वाढ लक्षणीय आहे. २०१४मध्ये या जिल्ह्य़ाचा निकाल ८८.२४ टक्के होता. २०१५मध्ये या जिल्ह्य़ाची टक्केवारी नागपूर विभागात सर्वाधिक म्हणजे ९४.६८ टक्के आहे. यंदा नागपूर जिल्ह्य़ाचा निकाल ९२.११ टक्के लागला. मागच्या वर्षी ही टक्केवारी ९०.७७ टक्के होती. अशाच प्रकारे कमी अधिक प्रमाणात गडचिरोलीचा अपवाद सोडता सर्वच जिल्ह्य़ांच्या निकालात वाढ झालेली दिसून येते. यंदा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. २०१४ मध्ये या विद्यार्थ्यांची टक्केवारी २५.४९ होती, यंदा ती ४९.०९ टक्के आहे. ही वाढ २३.०६ टक्के इतकी आहे. शाळांचा दर्जा तिचा निकाल किती टक्के लागला यावरून ठरते. त्यामुळे शाळाही मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत गंभीरपणे विचार करते. त्याचप्रमाणे गावोगावी सुरू झालेले खासगी शिकवणी वर्ग, मुलांच्या शिक्षणाबाबत पालकांमध्ये वाढत चाललेली जागृती आणि स्वत: विद्यार्थी सुद्धा मेहनत घेत असल्याने निकालाचा आलेख सातत्याने वर सरकत आहे. प्रात्याक्षिक परीक्षांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळत असल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढते. यंदा दहा मिनीट आधी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. त्याचेही प्रतिबिंब निकालात उमटले आहे.

पाणीपुरीवाल्याची मुलगी बनणार सीए
अभ्यासासाठी स्वतंत्र खोली, संगणक तसेच अत्याधुनिक सुविधा असल्याने परीक्षेतील गुणांची टक्केवारी वाढते, हा समज खोटा ठरवत वाणिज्य शाखेतून रूपल गुप्ता हिने ९७.०९ टक्के गुण मिळवले आहे. पाणीपुरीचा व्यवसाय आणि आर्थिक स्थिती बेताची असलेल्या रवींद्र गुप्ता यांच्या लाडकीने आईच्या शेजारी बसून अभ्यास केला आणि बारावीच्या परीक्षेत ९७.०८ टक्के मिळवले आहे. गुप्ता यांनी पैशाची आवश्यकता असल्याने शहराच्या मध्यभागी असलेले हंसापुरी येथील घर विकून वाडी येथे छोटा घर विकत घेतला. तेथे पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय करीत त्यांनी घर चालविला. पण मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी पैसे कमी पडू दिले नाही. घर विकल्यानंतर मिळालेले थोडे पैसे राखून ठेवले आणि मुलीच्या शिक्षणासाठी खर्ची घालत आहे. रूपल देखील जिद्दीने अभ्यास करीत होती. तिच्यावर कोणतेही दडपण पालकांचे नव्हते. त्यामुळे ती स्वखुशीने हवा तेवढा आणि हवे तेव्हा अभ्यास करायची. नववी उत्तीर्ण होताच मुलांच्या हातात दुचाकी देण्याच्या जमाण्यात रूपल वाडीवरून डॉ. आंबेडकर महाविद्यालयात शहर बसने ये-जा करीत होती. आठवीपासून सी.ए. बनायचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यामुळे वाणिज्य विद्याशाखेत प्रवेश घेतला. तिने अकरावीतच सी.ए. क्लास लावून अधिक परिश्रम घेतले. यातून विषयाचे पायाभूत ज्ञान मिळाले. त्यामुळे बारावीत अभ्यास करणे सोपे गेले. महाविद्यालयातील नियमित वर्ग आणि सीएची तयारीचे ज्ञान. ती जिंदल पब्लिक स्कूलमधून दहावी झालेल्या रूपल गुप्ताला दहावीत ९५.८ टक्के गुण होते. आई गृहिणी आहे. तीच माझी रोल मॉडेल आहे. अभ्यास करताना मला कुठलाही त्रास होणार नाही. याची पुरेपूर काळजी ती घेत होती. ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळतील, असे वाटत होते, असे ती म्हणाली. प्रसार माध्यमांनी आईवडिलांना रूपलच्या अभ्यासाविषयी विचारले असता आई पुष्पा यांना अश्रू अनावर झाले. भावनिक होऊनच पुष्पा गुप्ता यांनी त्यांच्या लाडकीचे कौतुक होत असतानाच सहावीतील लहान मुलगी पारूल ही देखील हुशार आहे आणि भविष्यात ती देखील दहावी व बारावीत, असेच गुण संपादित करेल तेव्हा तिचेही असेच कौतुक कराल, असे म्हणत त्यांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली.

यशला कॉर्डियोलॉजिस्ट बनायचे
यशातील सातत्य कायम ठेवत यश चांडक या दीक्षाभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांने विज्ञान विद्या शाखेत घवघवशीत यश संपादित केले. त्याने ९७.८५ टक्के गुण मिळवून शहरात विज्ञान विद्या शाखेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त करून मत्स्यविज्ञानात त्याला २०० पैकी १९८ गुण मिळाले आहेत. रोजचा सहा तास अभ्यास झालाच पाहिजे, अशी खूणगाठ बांधत त्याने अभ्यासातील सातत्य शेवटपर्यंत कायम ठेवले. कॉर्डियोलॉजिस्ट बनण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.
दिग्रसच्या विद्यानिकेतन इंग्लीश स्कूलमधून दहावीत ९८.५५ टक्के गुण घेऊन अमरावती शिक्षण मंडळात प्रथम आलेल्या यशने बारावीतही यशश्री खेचून आणून यशातील सातत्य कायम राखले. नियमित अभ्यास हेच त्याच्या यशाचे गमक असल्याचे यशने स्पष्ट केले. गेल्या दोन वर्षांत कुठल्याही कौटुंबिक किंवा सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी न लावता त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. हल्ली शालेय विद्यार्थ्यांकडे मोबाईल सहज उपलब्ध असतानाही यशने मोबाईलजवळ बाळगला नाही. बारावीतील घवघवीत यशानंतर त्याच्या आवडीचा मोबाईल घेऊन देणार असल्याचे आश्वासन वडील प्रवीण चांडक यांनी दिले आहे.
दिग्रस येथील विज्ञान महाविद्यालयात पदार्थविज्ञान विषयाचे ते प्राध्यापक आहेत. यशची आई एम.एस्सी. असून मुलांच्या संगोपणासाठी नोकरी न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. यशला क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळायला आवडते.

दहावीच्या परीक्षेत ९८.१८ टक्के गुण घेऊन गुणवंत ठरलेली यादीत झळकलेली प्रियंका जोशी हिने बारावीच्या परीक्षेतसुद्धा यशाची परंपरा कायम राखली. अभ्यास आणि उजळणी यावर अधिक भर दिला, याव्यतिरिक्त काहीही विशेष केले नाही. मेहनतीवर विश्वास होता आणि त्याचेच फळ मिळाले. अभ्यासासाठी असे खूप नियोजन करावे लागले नाही. शिकवणी वर्गामुळे वेळेचे व्यवस्थापन करणे थोडे जड गेले, पण महाविद्यालयातील प्राध्यापकांनी तेवढेच सहकार्यसुद्धा केले. परीक्षेच्या दोन महिने आधीपासून अभ्यासाचे व्यवस्थापन जमवले. वैद्यकीय क्षेत्राकडे आता वाटचाल करायची असल्याचे प्रियंका म्हणाली. राजकीय घडामोडी जाणून घेण्याची फारशी उत्सुकता नाही आणि सोशल नेटवर्किंगसाईटचासुद्धा वापर फारसा करीत नसल्याचे प्रियंकाने सांगितले.

शिवाजी सायन्स महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असलेल्या प्रियंका जोशीला ९६.०३ टक्के गुण मिळाले. प्रियंकाचे वडील अभिजीत जोशी आयव्हीआरसीएल कंपनीत सिव्हील इंजिनिअर आहे तर आई स्वाती जोशी गृहीणी आहे.