विशेष प्रतिनिधी, नवी मुंबई

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे निराश झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांनी आपले कुटुंबीय आगामी नवी मुंबई पालिका निवडणुकीत एकही उमेदवार नगरसेवक पदासाठी उभा न करण्याचे संकेत नाईक यांनी नुकत्याच झालेल्या पक्षाच्या च्िंातन बैठकीत दिले आहेत.

यापूर्वी नाईक यांचे बंधू ज्ञानेश्वर नाईक, ज्येष्ठ चिरंजीव डॉ. संजीव नाईक, विद्यमान आमदार संदीप नाईक यांची राजकीय कारकीर्द पालिकेतून सुरू झालेली आहे. नाईक यांच्या घरात मंत्री, खासदार, आमदार, महापौर ही महत्त्वाची सर्व पदे असल्याने त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात होता. नाईकांच्या या घोषणेमागे पुढील वर्षीचे महापौरपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याचे कारण सांगितले जात आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांची एकहाती सत्ता असल्याचे म्हटले जात होते. मात्र सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या हातून मोदी लाटेत सर्वप्रथम खासदारकी गेली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांची स्वत:ची आमदारकी गेल्याने नाईक कुटुंबीयांना मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. ही दोन महत्त्वाची राजकीय पदे गेल्यानंतर आता नवी मुंबई पालिकेतील सत्तेचे काय होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. कोणाच्या ध्यानीमनी नसताना बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांनी आमदारकी खिशात घातल्याने आणि ऐरोलीत भाजपचे नवखे उमेदवार वैभव नाईक यांनी ४६ हजार मते मिळविल्याने नवी मुंबईत मोदी लाट आजही कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावेळी पालिकेत भाजपा मुसंडी मारणार हे निश्चित दिसून येत असून राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक ऐन निवडणुकीच्या अगोदर भाजपात उडय़ा मारण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे विषाची परीक्षा न घेण्याचा निर्णय नाईक यांनी घेतला असून नगरसेवकपदासाठी एकही घरचा माणूस निवडणुकीत उभा न करण्याचा निर्णय त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला. यापूर्वी त्यांचे बंधू ज्ञानेश्वर नाईक, चिरंजीव संजीव, संदीप, पुतण्या सागर नाईक नगरसेवक म्हणून पालिकेत गेले होते. त्यापैकी संजीव व सागर नाईकांनी पाच-पाच वर्षे महापौरपद भूषविले आहे. यावेळचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने नाईक कुटुंबीयातील एकाचीही त्यावर वर्णी लागण्याची शक्यता नसल्याने नाईकांनी ही घोषणा केल्याची चर्चा आहे. नाईकांनी एकीकडे ही घोषणा केली असताना ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी भाजपवासी झालेले त्यांचे पुतणे वैभव नाईक हे नगरसेवक पदाला उभे राहणार असल्याची चर्चा आहे.

 

नवी मुंबईचे महापौरपद सर्वसामान्य नागरिकाला मिळावे, त्याचीही महापौर बंगल्यात राहण्याची हौस पुरी व्हावी यासाठी विधानसभा निवडणुकीअगोदर सर्वप्रथम मी ही घोषणा केलेली आहे. माझ्या घरातील कोणतीही व्यक्ती पालिकेत जाणार नाही असे मी जाहीर केले आहे. तेच बघून नाईकांनी आता ही घोषणा केली. त्याचबरोबर आता आपल्या घरातील आरक्षणामुळे कोणीच महापौर होणार नाही हे लक्षात आल्याने नाईकांनी हे औदार्य दाखविले असून ही घोषणाही स्वार्थी आहे.
मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर.