नागपुरातील इतिहासकालीन नाईक तलाव व लेंडी तलावांमध्ये पाणवेलींचे जंगल निर्माण झाले असून परिणामी या परिसरात डासांचा प्रकोप वाढला आहे. या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला असून घरोघरी आजारही वाढले आहेत.
एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी नाईक व लेंडी तलावांचा वापर होत असे. कालांतराने या तलावाभोवती वस्ती झाली आणि वर्तमानात या तलावाला डबक्याचे स्वरूप आले आहे. परिसरातील वापरलेले घाण पाणी थेट या तलावात जमा होते. कचराही त्यात टाकला जातो. आता या तलावात पाणवेली प्रचंड प्रमाणात वाढली आहे. नजर टाकाली तेथे हिरव्यागार पानांनी हा तलाव व्यापलेला दिसतो. अनेक वर्षांपासून पाणवेली काढल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या तलावात जंगलच तयार झाले आहे. त्यात पाणी आहे का, असाच पाहणाऱ्याला प्रश्न पडतो.
या परिसरात राहणारे लोक तलावाच्या काठावरील काही पाणवेली उपटून तेथील पाण्यात कपडे धुतात, भांडीही घासतात. दोन्ही तलावांमध्ये पाणवेली वाढल्याने येथे डासांचा प्रकोप वाढला आहे. दुगर्ंधीबरोबरच किडय़ांचाही प्रकोप वाढला आहे. डास व किडय़ांच्या चाव्यांनी नागरिक हैराण आहेत. कुणाला त्वचा रोग तसेच त्यातून जखमा झाल्या आहेत. अंगावर खाज तसेच थंडी वाजून ताप येणे बहुतेक घरात सामान्य बाब झाली आहे. घरोघरी विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी डासांना अटकाव करण्यासाठी घरात अनेक उपाय केले. मात्र, डास व किडय़ांचे प्रमाणच प्रचंड असल्याने त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
या तलावाकडे महापालिकेचे दुर्लक्षच असल्याचे नागरिकांनी सांगितले. नाही म्हणायला पाच वर्षांपूर्वी तलावाच्या काठावर दोन उद्याने तयार झाली होती. मुलांना खेळायला काही खेळणी लावण्यात आली होती. तलावाच्या सभोवताल लोखंडी रेलिंग, ग्रील व कठडे लावण्यात आले होते. काही दिवसात लोखंड चोरीला गेले. झाडे-हिरवळ नावापुरतीच उरली. खेळणी तुटली. पाणवेलींचे समूळ उच्चाटन करून तलाव स्वच्छ करण्याचे महापालिका प्रशासनाला वाटत नाही.
 इंग्रजांच्या काळापासून हे दोन्ही तलाव आहेत. त्यातच परिसरातील गटारींमधील पाणी या तलावात सोडले जाते. या परिसरात नव्याने गटारी टाकणे, पाणवेली काढून तलावाची स्वच्छता करणे, डास निर्मूलन आदी कामांसाठी कोटय़वधी रुपयांचा निधी लागणार आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेजवळ एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी नाही, हे वास्तव आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्याचे पर्यटन मंत्री संजय देवतळे व खासदार विलास मुत्तेमवार यांनी या तलावांची पाहणी करून सौंदर्यीकरणाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर काहीच झालेले नाही. ते केव्हा होणार, असा सवाल या परिसरातील नागरिकांचा आहे.