शहरात दरवर्षी रमजान ईदच्या दिवशी होणारे सामूहिक नमाज पठण मंगळवारी मुसळधार पावसामुळे ईदगाह मैदानाऐवजी जुन्या नाशिक येथील शाही मशिदीत उत्साहात पार पडले. मुस्लिम बांधवांची संख्या मोठी असल्याने शाही मशिदीत तीन टप्प्यात तर वेगवेगळ्या मशिदींमध्येही नमाज पठण करण्यात आले. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी परस्परांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.
रमझान ईद तसेच बकरी ईदच्या दिवशी ईदगाह मैदानावर सामूदायिक नमाज पठणाचा कार्यक्रम होतो. रमजान ईदनिमित्त सकाळी १० वाजता खतीब ए नाशिक हाफिज हिसामोद्दीन अशरफी यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले. परंतु, शहर व परिसरात मध्यरात्रीपासून संततधार सुरू होती. सकाळी पावसाचा जोर वाढल्याने मुख्य नमाज पठणाच्या कार्यक्रमात बदल करण्यात आले. हा कार्यक्रम ईदगाह मैदानाऐवजी जुने नाशिक परिसरातील शाही मशिदीत तीन टप्प्यात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पाऊस सुरू असल्याने एकाच ठिकाणी गर्दी न करता आपल्या परिसरातील मशिदींमध्ये नमाज पठण करून रमजान ईद साजरी करावी असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार सकाळी १० वाजता नमाज हाफिज अब्दुल जब्बार, साडे दहा वाजता खतीब-ए-शहर हाफिज हिसामोद्दीन आणि ११ वाजता हाफिज अहमद रझा यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नमाज पठण करण्यात आले. तीन टप्पात झालेल्या नमाज पठणात मोठय़ा संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.