पाऊस, गारपीट आणि त्यानंतर कडक उन्हाळा या पाश्र्वभूमीवर नांदगाव तालुक्यात लोकसभा निवडणुकीविषयी मतदारांमध्ये अनुत्साह दिसून येत आहे. नांदगाव तालुका दिंडोरी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीसह अन्य पक्षांकडून प्रचाराला वेग देण्यात आला असला तरी मतदारांच्या निरूत्साहामुळे प्रचारावरही परिणाम जाणवत आहे. प्रारंभी तालुक्यात मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीपेक्षा घटण्याची शक्यता व्यक्त होत असताना विदर्भात मतदानास चांगला प्रतिसाद मिळाल्याने येथेही टक्केवारीत वाढ होऊ शकेल, अशी राजकीय पक्षांची अपेक्षा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरीची लढत प्रतिष्ठेची केली आहे. पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी काँग्रेससह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र आले असून कोणत्याही परिस्थितीत पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचा चंग पक्षाच्या नेत्यांनी बांधला आहे. त्यासाठी खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत वणी येथे सभा झाली आहे. तर, पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार हे दोघे काही सभा घेणार आहेत. मतदारांना मात्र नेत्यांच्या या भूमिकेशी काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात मतदानाबाबत उत्साह दिसून येत नाही. मतदार आपल्या शेतीच्या आणि इतर कामाच्या व्यापात आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु मतदारांमध्ये निवडणुकीविषयी फारशी चर्चा होत असल्याचे दिसत नाही. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कशी भरून काढायची हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत मतदारांनी निवडणुकीपेक्षा शेतातील कामांना महत्व दिल्याचे यानिमित्ताने दिसून येते. अनेक भागात पाणीप्रश्न तीव्र झाला आहे. अनेक वाडय़ा-वस्त्यांवर पाण्याचा प्रश्न भेडसाऊ लागला आहे. पाण्यासठी अनेकांना वणवण भटकंती करण्याची ऐन उन्हाळ्यात आणि निवडणुकीच्या कालखंडात आल्याने मतदानाविषयी जनतेला काहीच देणे-घेणे नाही. असेच चित्र आहे.
नांदगाव, येवला, चांदवड हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निकालावर सर्वाधिक प्रभाव टाकणारे तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यातील राजकीय गणित समजावून घेत त्याप्रमाणे प्रचाराची व्यूहरचना महायुती आणि आघाडीकडून व अन्य पक्षांकडून आखली जात आहे. लोकसभेच्या मागील निवडणुकीत युतीचे हरिश्चंद्र चव्हाण यांना काही तालुक्यात भरभक्कम आघाडी मिळाली होती. सुशिक्षित मतदारांचा अधिक भरणा असलेल्या या तालुक्यातील राजकारण पक्षांपेक्षा गटातटांवर अधिक अवलंबून असते. परंतु यावेळच्या निवडणूक प्रचारात उमेदवारांचा पक्ष हा मुद्दा प्रथमच अधिक चर्चेत आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ वणी येथे मागील आठवडय़ात शरद पवार यांच्या झालेल्या सभेत आघाडीचे बहुतेक सर्व नेते उपस्थित होते. नांदगाव तालुक्यात मनमाड शहरात मतदारसंख्या अधिक आहे. त्यामुळे या गावातून अधिकाधिक मतदान कसे होईल यासाठी उमेदवारांचे समर्थक व्यूहरचना आखत आहेत.