वाहनांची वर्दळ असणाऱ्या नांदगाव-मनमाड रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ठायी ठायी खड्डे निर्माण झाल्याने अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. लोकप्रतिनिधींसह सर्वानीच रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.
तालुक्यातील नांदगाव आणि मनमाड या दोन प्रमुख शहरांना जोडणारा तसेच नाशिककडे जाणारा हा रस्ता काही महिन्यांपासून पूर्णपणे उखडला गेला आहे. या भागाला जोडणाऱ्या हिसवळ, पानेवाडी, जोंध़ळवाडी तसेच अन्य गावातील शेतक ऱ्यांना याच रस्त्याने बाजार समिती गाठावी लागते. त्यांना रस्त्याच्या बिकट अवस्थेचा मोठा फटका सहन करावा लागत असून रस्त्याच्या अवस्थेमुळे टायर पंक्चर होणे, टायर फुटणे तसेच वाहनातून शेतीमाल सांडणे यासारख्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली असली तरी त्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे वाहन चालकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी चांदवड-मनमाड रस्ता दुरूस्तीचे ेकाम करण्यात आले. त्यामुळे मनमाड-नांदगाव रस्ता दुरूस्त केला जाईल, अशी अंधुकशी आशा होती. परंतु ही आशा फोल ठरली असून दुरूस्ती होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.