काँग्रेसचा कधी काळी बालेकिल्ला असलेल्या बेलापूर पट्टीत काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी कोकणचे शिलेदार व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे पक्षाने नवी मुंबई पालिका निवडणुकीची सूत्रे दिली असून, अकार्यक्षम, अविश्वसनीय नेत्यांच्या बळावर राणे ही स्वारी करणार आहेत. मे १९९५ पासून आजतागायत या पक्षातील एकाही नगरसेवकाचा पायपोस एकमेकात राहिलेला नसून अविश्वासाचे वातावरण नसानसांत भरलेले आहे. त्यामुळे गेल्या २० वर्षांत या पक्षाची शहरात नेहमीच घसरण होत आली असून, दोन्ही निवडणुकांत हा पक्ष चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. त्यामुळे या पक्षात राहणे म्हणजे राजकीय कारकिर्दीचा नाश करणे अशी अटकळ मनाशी बांधलेले अनेक आजी-माजी नगरसेवक पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत.
नवी मुंबईतील काँग्रेसला एकहाती नेतृत्व नसल्याने दुहीच्या वाळवीने या पक्षाला केव्हाच पोखरून टाकले आहे. त्यामुळे पालिकेच्या पहिल्या सत्रात गणेश नाईक यांना शिवसेनेने सापत्नभावाची वागणूक देण्यास सुरुवात केल्यानंतर शहराचा महापौर करण्याची आलेली संधी या पक्षातील काही फुटीर नगरसेवकांमुळे हुकली. त्यानंतर या पक्षाचा नेहमीच ऱ्हास झाला असून, राज्यात पानिपत झालेल्या काँग्रेसने नवी मुंबई पालिकेत सत्ता आणण्यासाठी राणे यांना मोहिमेवर धाडले आहे. त्यामुळे राणे यांच्या वाटय़ाला आणखी एक दारुण पराभव येणार, यापेक्षा काही नवीन होणार नाही. हा पक्ष आतून बाहेरून कटकारस्थानांमुळे चांगलाच पोखरला असल्याने जगासमोर हातात हात घालणारे पक्षाचे नेते कधी पायात पाय घालून पाडतील याचा नेम राहिलेला नाही. अशा ओसाड गावाचे राजेपद राणे यांना देऊन काँग्रेसने त्यांना अधिक नामोहरम करण्याची व्यहूरचना रचल्याची चर्चा त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांत आहे. विधानसभा निवडणुकीत या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाचा प्रचार केला. त्यासाठी आपले चांगभलेदेखील करून घेतले. या फुटिरांची यादी उमेदवार नामदेव भगत यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिली आहे. त्यानुसार त्यांना कारणे दाखवा नोटीसदेखील पाठविण्यात आली आहे. पण या नेत्यांवर कारवाई केली तर पक्षात बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते शिल्लक राहितील या भीतीने त्यांच्यावर पक्षाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी कारवाई केलेली नाही. याला कंटाळून नामदेव भगत दुसरा विठ्ठल शोधण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राणे यांचे एक पाऊल वाशी खाडीपुलावर पडण्याअगोदर या पक्षातील फूट अटळ आहे. अशा अकार्यक्षम अविश्वसनीय नेत्यांना घेऊन राणे पालिकेवर स्वारी करण्याची तयारी करणार आहेत. ती कितपत यशस्वी होते, हे येणारा काळ ठरविणार असल्याची चर्चा आहे.