दिंडोरीतील सभेच्या आशा धूसर
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रविवारपासून सुरू होणार असला तरी त्यात अजून तरी नाशिक किंवा दिंडोरी यापैकी एकाही मतदारसंघात त्यांची सभा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. देशभरात मोदींच्या सभा गाजत असल्याने त्यांची जिल्ह्यात एकतरी सभा व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे नाशिक व्यतिरिक्त मोदी यांच्या उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तिघा जिल्ह्यांमध्ये सभा होणार आहेत. त्या जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या सभांचे आयोजन करता येणे शक्य असताना नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी सभेच्या आयोजनात कमी पडले काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
उत्तर महाराष्ट्रातील सर्व सहा मतदारसंघांमध्ये २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी म्हणजे २२ तारखेला प्रचार थांबणार आहे. म्हणजेच प्रचारासाठी अवघे सहा दिवस उरले आहेत. प्रचाराचा हा अंतिम टप्पा असल्याने अधिकाधिक जाहीर सभांचे आयोजन करण्याकडे सर्वच पक्षांचे लक्ष आहे. त्यात १७ एप्रिलपासून राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वत: दोन दिवस जळगाव जिल्ह्यात तळ ठोकणार आहेत. त्यानंतर ते नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात सभा घेतील. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे इतर नेतेही जिल्ह्यात येणार आहेत. नाशिक मतदारसंघातील निवडणूक राष्ट्रवादीसाठी अधिक प्रतिष्ठेची झाली आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या  प्रचारात काँग्रेसचे अनेक नेते अजूनही सक्रिय झालेले नसल्याने आणि त्यातच सिन्नर येथे भुजबळांच्या समर्थनार्थ आयोजित मेळाव्यात माणिकराव कोकाटे समर्थकांनी एकच गोंधळ घातल्याच्या पाश्र्वभूमीवर शरद पवार यांनी भुजबळ यांचा प्रचार अधिक गांभिर्याने घेतला आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ज्याप्रमाणे शरद पवार यांच्या सभांची गरज भासत आहे. त्याप्रमाणे भाजप उमेदवारांना नरेंद्र मोदी यांच्या सभा आपल्या मतदारसंघात व्हाव्यात असे वाटत आहे. मोदी यांच्या सभेने मतदारसंघातील चित्र संपूर्णपणे पालटून जाईल असे महायुतीच्या उमेदवारांना वाटत आहे. उत्तर महाराष्ट्रातील सहा जागांपैकी नाशिकचा अपवाद वगळता इतर पाचही जागांवार भाजपचे उमेदवार आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात मोदी यांची किमान एक सभा व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना नाशिक जिल्हा वगळता उर्वरित उत्तर महाराष्ट्रासाठी यश आले आहे.
रविवारी जळगाव येथे होणाऱ्या सभेपासून मोदी यांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यास सुरूवात होणार आहे. त्यानंतर २२ एप्रिल रोजी धुळे आणि नंदुरबार येथे त्यांच्या सभांचे नियोजन होऊ शकेल. अर्थात या दोन्ही सभा होतील किंवा नाही हे अद्याप अनिश्चित आहे. परंतु सभा होतील हे गृहित धरून धुळे येथे मैदान तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे.
नाशिक मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेचा उमेदवार आहे. तर दिंडोरीत भाजप उमेदवार आहे. या दोन्ही मतदारसंघांसाठी मोदींची एक संयुक्त सभा व्हावी म्हणून भाजपकडून प्रयत्न करण्यात येत होते. शरद पवार यांनी घेतलेल्या सभेला उत्तर देण्यासाठी म्हणून वणी येथेच ही सभा घेण्यात यावी, असाही आग्रह होता. परंतु मोदींची सभा होणार किंवा नाही याविषयी अद्याप कोणतीच माहिती नाही.
मोदी यांची सभा अनिश्चित असताना ती सभा कुठे घेण्यात यावी याविषयी त्या त्या भागातील कार्यकर्त्यांकडून भूमिका मांडणे सुरू झाले. पिंपळगाव बसवंत हे महामार्गावरील मोठे ठिकाण असल्याने आणि दिंडोरी मतदारसंघाच्या मध्यवर्ती असल्याने येथे सभा घेण्यात यावी असे त्या भागातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर, मोदींच्या सभेचा लाभ नाशिक मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारालाही व्हावी म्हणून नाशिकच्या जवळ या सभेचे आयोजन करण्याची सूचनाही होत आहे.
दरम्यान या सभांच्या आयोजनावर अधिकृततेचा शिक्का बसेपर्यंत उमेदवारांनी मात्र आपल्या प्रचारात कोणताही खंड पडू न देता ठिकठिकाणी प्रचार फेऱ्या सुरूच ठेवल्या आहेत.