मोदी सरकारने जाहीर केलेली पहिलीच रेल्वे भाडेवाढ मागे घ्यावी, यासाठी खासदार डॉ. किरीट सोमय्या व अन्य भाजप नेत्यांमध्ये श्रेयासाठी चढाओढ लागली होती, पण सोमय्या यांना आपल्या कार्याच्या त्रमासिक अहवालात मात्र या कामगिरीचा विसर पडला आहे. महागाईविरोधात आवाज उठविल्याचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील खासदारांच्या घेतलेल्या हजेरीचा हा परिणाम असावा, अशी चर्चा आहे.
मोदी सरकार सत्तेवर आल्यावर काँग्रेसच्या राजवटीत रोखून ठेवलेली रेल्वेभाडेवाढ करण्यात आली. मुंबईकरांच्या पासचे दर व तिकिटांचे दर वाढल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली. विरोधी पक्षनेते विनोद तावडे, डॉ. सोमय्या आणि शिवसेनेच्या खासदार गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, अरविंद सावंत आदी खासदारांनी रेल्वेमंत्र्यांकडे धाव घेऊन ही अन्यायकारक दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली होती. जनभावनेची दखल घेऊन उपनगरी रेल्वेप्रवाशांच्या द्वितीय वर्गाच्या पासाची दरवाढ मागे घेतली गेली. त्याचे श्रेय घेणारे फलक मुंबईत लागले. श्रेयासाठी चढाओढ होती.
मात्र संसद अधिवेशन काळात मोदी यांनी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेऊन कानपिचक्याही दिल्या. आता तुम्ही विरोधी पक्षाचे नाही, तर सत्ताधारी पक्षाचे सदस्य आहात. ऊठसूट केंद्र सरकारकडे येण्यापेक्षा सरकारचे निर्णय कसे आवश्यक आहेत, ते कोणत्या परिस्थितीत घेतले आहेत, याची कल्पना जनतेला द्या, अशा सूचना मोदी यांनी दिल्या होत्या. प्रसिद्धीमाध्यमांमध्ये झळकणाऱ्या खासदारांवरही त्यांनी टिप्पणी केली होती.
त्यामुळे सोमय्या यांनी आपल्या खासदार म्हणून केलेल्या त्रमासिक अहवालात रेल्वेदरवाढ व महागाईचा उल्लेखही केला नसण्याची शक्यता आहे. मेट्रोदरवाढ, लोकसभेत मांडलेले विविध प्रश्न, मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न, हाती घेतलेली कामे आदींचा उल्लेख या अहवालात आहे.