महापालिकेतील तिसऱ्या आघाडीत फूट पडून दोन्ही गटांनी गटनेते पदावर दावा केल्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी नरेंद्र सोनवणे हेच गटनेते असल्याचा निर्वाळा दिला आहे. महापौर निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या या निकालामुळे निष्टावान गटाला बळ मिळाले असून आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी या संदर्भात  पत्रकार परिषद घेऊन महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आघाडीच्या सर्व २४ सदस्यांना सोनवणेंद्वारा पक्षाध्यक्ष बजावण्यात येणार असल्याचे सांगितले.
जुलै महिन्यात स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीसाठी झालेल्या विशेष महासभेत तिसऱ्या आघाडीत फूट पडली होती. या सभेत प्रारंभापासून आघाडीचे गटनेते म्हणून कामकाज बघणारे नरेंद्र सोनवणे व मौलानांच्या आघाडीला आव्हान देणारे मोहंमद सुलतान अशा दोघांनी गटनेते पदावर दावा केला होता. काँग्रेसच्या महापौर ताहेरा शेख यांनी सुलतान यांनी सुचविलेल्या दोघांची नावे स्थायीसाठी जाहीर केली होती. महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेस व तिसऱ्या आघाडीच्या युतीने सत्ता स्थापन केली. त्यानुसार महापौरपद काँग्रेसला तर उपमहापौरपद तिसऱ्या आघाडीच्या वाटय़ाला आले होते. शिवाय स्थायी समिती सभापतीपद व अन्य समित्यांचे उभयपक्षी वाटप करण्यात आले होते. तथापि दोन वर्षांनंतर काँग्रेसच्या कारभारावर नाखूष होऊन मौलाना मुफ्ती यांनी पालिकेत काँग्रेसशी असलेला घरोबा तोडण्याची भाषा सुरू केली. इतकेच नव्हे तर काँग्रेस वगळता अन्य पक्षांची मोट बांधून महापौरपदावरून काँग्रेसला पायउतार करण्याचे प्रयत्न सुरू केले.
दुसरीकडे स्थायी तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांच्या निवडीच्या वेळी तिसऱ्या आघाडीतील मतभेद उफाळून आल्याने त्यांच्या स्वत:समोरच अडचणी वाढल्या.
या पाश्र्वभूमीवर तिसऱ्या आघाडीचे एक सदस्य मोहंमद इब्राहिम यांनी विभागीय आयुक्तांना पत्र देऊन आघाडीचे गटनेते नेमके कोण आहेत यासंबंधी विचारणा केली असता नरेंद्र सोनवणे हेच या आघाडीचे गटनेते असल्याचे लेखी स्पष्टीकरण आयुक्त कार्यालयाने केले आहे.
१५ डिसेंबर रोजी ताहेरा शेख यांच्या महापौर पदाची मुदत संपणार असून तत्पूर्वी नवीन महापौरांची निवडणूक होणार आहे. अन्य पक्ष व आघाडय़ांच्या पाठिंब्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केला आहे.
मोहंमद इब्राहिम हे तिसऱ्या आघाडीकडून महापौर पदासाठी उमेदवार असतील अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली.