विदर्भ विकास क्रांती संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते नरेश निमजे यांनी ३८ मिनिटे शीर्षांसन करून जुना ३४ मिनिटांचा विक्रम मोडला. पहिला जागतिक विक्रम आखाती देशातील ईवान च्यानली यांनी केला होता. आता त्यांनीच ६१ मिनिटे शीर्षांसन करून स्वत:चा विक्रम मोडला. यानुसार नरेश निमजे यांनी शीर्षांसनामध्ये जगात द्वितीय स्थान तर भारतामध्ये प्रथम स्थान पटकावले आहे.
शीर्षांसनाचा आगळावेगळा कार्यक्रम सुभाष मार्गावरील शहीद स्मारक परिसरात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे यांच्या हस्ते पार पडले. निमजे यांनी सांगितले की, ते महाराजबागेत दररोज योगासन करतात. सुरुवातीला पाच ते सात मिनिटे शीर्षांसन करीत असे. त्यानंतर ही वेळ वाढवून तीस मिनिटांपर्यंत नेली. यावेळी उमेश चौबे यांनी प्रोत्साहन दिले व जागतिक विक्रम करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसारच मी हा विक्रम करू शकलो, अशी भावनाही निमजे यांनी व्यक्त केली. निमजे यांच्या आरोग्याचे निरीक्षण व देखरेख भोपाळवरून आलेले वैद्यराज डी.जे.सिंह यांनी केले. शीर्षांसन पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ केल्यास मेंदूवर आघात होण्याची शक्यता असते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. असे असतानाही निमजे यांनी हे आव्हान स्वीकारले.
यावेळी विधी विशेषज्ञ डॉ. राजेंद्र गुंडलवार शीर्षांसनाचा विक्रम करणार होते. परंतु त्यांच्या मानेमध्ये त्रास होऊ लागल्याने त्यांना हा प्रयत्न मध्येच सोडावा लागला. निमजे हे गुंडलवार यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शीर्षांसन करीत होते.