विविध कारणांमुळे सदैव चर्चेत राहणाऱ्या आणि दिवसेंदिवस तोटय़ामध्ये रूतत चाललेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मागील वर्षी प्रशासकाची नियुक्ती झाली आणि बँकेला उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. बँकेला २०१३-१४ या आर्थिक वर्षांत १९ कोटी ७४ लाख इतका नफा झाला आहे. सभासदांना लाभांश देण्याचे उद्दिष्टय़े प्रशासक मंडळाने नजरेसमोर टेवले आहे.
प्रशासक नियुक्तीवेळी बँकेवर ७९.९२ कोटी संचित तोटा होता. एकूण ठेवी २८४४ कोटी होत्या. वसुलीचे प्रमाण केवळ ३६ टक्के होते. बँकेच्या ग्राहक व सभासदांच्या सहकार्यामुळे बँकेच्या टेवींमध्ये मधल्या काळात चांगलीच वाढ झाली. कमी झालेल्या ठेवीच्या प्रमाणात ३१ मार्च २०१४ अखेर ४५६ कोटींनी वाढ होऊन ठेवींनी ३३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. मे २०१४ अखेर ४७ टक्के कर्ज वसुली झाली आहे. ३१ मार्चअखेर बँकेचे भाग भांडवल १६१.२२ कोटीपर्यंत गेले. बँकेस ३१ मार्चअखेर ढोबळ नफा ४७.८८ कोटी इतका झाला असून आवश्यक एकूण तरतुदी २८.६८ कोटी वजा जाता बँकेस १९.७४ कोटींचा नफा झाला आहे.
नाशिक व निफाड सहकारी साखर कारखान्याकडील अनुक्रमे कर्ज ८४.४६ कोटी आणि १३६.७६ कोटी एनपीए झाले असून त्याकरिता १०० टक्के तरतूद करण्यात आलीआहे. २०१३-१४ मध्ये कारखान्याकडील वसुली नसतानाही बँकेस या आर्थिक वर्षांत नफा झाला आहे. तसेच यावर्षी बँक साखर कारखान्याकडील शिल्लक साखरेची विक्री करून एनपीए, थकीत कर्ज वसुल करून संचित तोटा संपूर्णपणे भरून काढण्याचा निश्चय प्रशासकीय मंडळाने केला आहे.
यंदा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे वसुलीस मर्यादा आली. त्यामुळे शासनाने ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानग्रस्त शेतकरी सभासदांकडील पीक कर्ज परतफेडीस ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली असून बँकेच्या प्रशासकीय मंडळाने अशा आपदग्रस्त नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून सरसकट सर्वच सभासदांना पीक कर्ज परतफेडीसाठी ३० जून ही अंतिम तारीख दिली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीतही सक्तीची वसुली न करता सामंजस्याने बँकेने वसुलीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
शेती-बिगरशेती-अकृषक थकबाकीदार सभासदांसाठी सामोपचार कर्ज परतफेड योजनेसही ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून पात्र सभासदांनी या योजनेचा मोठय़ा प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.