राष्ट्रवादी नेत्यांच्या दोन गटात झालेली धक्काबुक्की, नांदगावमध्ये मतदारांच्या खिशाला लटकणारे कॅमेरेयुक्त पेन, यामुळे मतदान प्रक्रियाच रद्द करण्याची झालेली मागणी, किरकोळ वादावादी आणि परस्परांवर घेतलेले आक्षेप.. अशा काही घटनांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला मतदानाच्या दिवशी वेगळे वळण मिळाले. मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. निवडणूक यंत्रणेने मतदान प्रक्रिया अतिशय सुरळीत आणि शांततेत पार पडल्याचा दावा केला. दुसरीकडे शहरातील रमाबाई आंबेडकर मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे देवीदास पिंगळे आणि शिवाजी चुंबळे यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. समर्थकांना पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. अनेक दिग्गजांच्या मतपेटीत बंद झालेल्या भवितव्याचा फैसला गुरुवारी होणार आहे.

संचालक मंडळाच्या ११ जागांसाठी जिल्ह्यातील ३२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलीस उपनिरीक्षकांसह सहा सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी १० जागा याआधीच अविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित ११ जागांसाठी ४१ उमेदवार िरगणात आहेत. त्यामध्ये अ गटाच्या पाच, तर राखीव गटाच्या सहा जागांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्याच्या (१५) या प्रमाणे नाशिक व मालेगावला, तर उर्वरित दोन ठिकाणी मुख्यालयी मतदान प्रक्रिया पार पडली. अपूर्व व अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखाली सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब हिरे पॅनेल, माजी आमदार माणिकराव कोकाटे व माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनेल, सुनील ढिकले व आ. अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली सहकारमहर्षी स्व. उत्तमराव ढिकले पॅनेल अशा तिन्ही पॅनेलमध्ये सहा राखीव जागांवर तिरंगी लढत झाली. त्यात तिन्ही पॅनेलचे अठरा आणि अपक्ष १३ असे एकूण ३१ उमेदवार रिंगणात आहेत. तर अ गटातील कळवण, नांदगाव, नाशिक, सिन्नर व निफाड या पाच जागांसाठी सरळ लढत होत आहे. सकाळपासून मतदानाला उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली. एकूण ४६५८ पैकी ३२०८ मतदारांनी दुपारी दोन वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. यामुळे निवडणुकीत ९५ ते १०० टक्के मतदान होईल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. मतदारांना वेगवेगळ्या स्वरूपाचे आमिष दाखविले गेल्याची चर्चा होती. काही ठिकाणी लक्ष्मीदर्शनही घडल्याचे सांगितले गेले.
तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली. त्याचे प्रत्यंतर प्रचार व मतदानावेळी प्रकर्षांने दिसले. रमाबाई आंबेडकर विद्यालयातील मतदान केंद्रावर सर्व पॅनेलच्या उमेदवारांची गर्दी झाली होती. नाशिक तालुका अ गटात राष्ट्रवादीचे देवीदास पिंगळे आणि शिवाजी चुंबळे या परस्परांविरोधात उभ्या ठाकलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. या गटात केवळ ६६ मतदार आहेत. यामुळे उमेदवारांनी मतदानांना आपलेसे करण्याची संधी सोडली नाही. त्याची परिणती या वादात झाल्याचे सांगितले जाते. आपले मतदार विरोधी उमेदवाराने पळविल्याचा आक्षेप पिंगळे गटाने घेतला. त्यावर चुंबळे गटाचे कार्यकर्ते थेट भिडले. परस्परांना धक्काबुक्की करण्यात आली. मतदान केंद्राबाहेर एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन लाठीमार करत जमावाला पांगविले. या गोंधळामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. ग्रामीण भागातही काही प्रकार घडल्याची चर्चा होती.
नांदगावमध्ये मतदारांनी आपल्याला मतदान केले आहे की नाही, हे दर्शविण्यासाठी एका बाहुलीबली उमेदवाराने थेट कॅमेरे असणारे पेन दिल्याचे सांगितले गेले. या माध्यमातून मतदाराने कोणाला मतदान केले याचे छायाचित्र काढण्यासाठी संबंधिताचा प्रयत्न असल्याची चर्चा होती. या स्वरूपाचे पेन खिशाला लावून आलेल्या मतदारांवर विरोधी उमेदवाराच्या प्रतिनिधीने आक्षेप घेतला. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी तो मान्य केला नाही. पुन्हा तसाच प्रकार घडल्याचे सांगितले गेले. ही निवडणूक प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी विरोधी उमेदवाराने केली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर अतिशय शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडल्याचा दावा निवडणूक यंत्रणेने केला. मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. सीमा हिरे, आ. अनिल कदम, आ. अपूर्व हिरे, माजी आमदार वसंत गीते, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार शिरीष कोतवाल, माणिक कोकाटे आदी दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. त्यांचे भवितव्य गुरुवारी मतमोजणीद्वारे निश्चित होईल.

वादाची दखल नाही
रमाबाई आंबेडकर विद्यालयातील मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जो काही वाद झाला तो केंद्राबाहेरील रस्त्यावर झाला आहे. त्या वादाचा मतदानावर कोणताही परिणाम झाला नाही. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहिली. मतदान केंद्राबाहेरील या घटनेची कोणतीही दखल घेण्याची गरज नाही.
जिल्हा बँक निवडणूक यंत्रणा