केंद्र व राज्यात भाजपचे सरकार सत्तारुढ झाल्यानंतर या पक्षाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे संबंधित असणाऱ्या संस्था आणि संघटनांनी अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू केली आहे. विश्व हिंदु परिषदेच्या स्थापनेला ५० वर्षे होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, सुवर्ण जयंतीनिमित्त ठिकठिकाणी आयोजित जिल्हावार हिंदु संमेलने हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. या संमेलनांच्या माध्यमातून विहिंपच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतात तब्बल पाच लाख सभासद नोंदणीचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत २५ जानेवारी २०१५ रोजी नाशिक जिल्हा हिंदु संमेलन होत आहे. महत्वाची बाब म्हणजे, विधानसभा निवडणुकीवेळी तपोवनातील ज्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली होती, तेच मैदान विहिंपच्या संमेलनासाठी निश्चित करण्यात आले आहे.
समाजातील अज्ञान, दारिद्र्य दूर करण्यासाठी व स्वत्वाची जाणीव असलेला समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने १९६४ मध्ये विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली. कट्टर हिंदुत्ववादामुळे नेहेमी चर्चेत राहणाऱ्या या संघटनेचे देशासह ३७ देशांमध्ये कार्य सुरू आहे. देशांतर्गत ४१ प्रांतामधून ५० हजार समित्यांच्या माध्यमातून विहिंप कार्यरत आहे. शैक्षणिक, आरोग्य, स्वावलंबन, शेती, सामाजिक व धार्मिक प्रकल्पांच्या माध्यमातून या संघटनेचे काम सुरू आहे. विहिंपची काही आंदोलने वादाचा विषय ठरली. काँग्रेसच्या सत्ताकाळात विरोधकांच्या कायम रडारवर राहिलेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी भाजपचे सरकार आरुढ झाल्यावर प्रभावीपणे काम करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. विहिंपच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून देशभर शोभायात्रा, रक्तदान शिबीर, नेत्रज्ञान जनजागृती मोहीम, पर्यावरण संरक्षण कार्यक्रम, रामोत्सव, जिल्हा हिंदु संमेलन आदी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर, विहिंपच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत जिल्हावार संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
२०१५-१६ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने या भागाकडे विहिंपने विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे विहिंपच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांचा सांगता कार्यक्रम ६ सप्टेंबर रोजी नाशिक येथे करण्यात येणार आहे. तत्पुर्वी, २५ जानेवारी २०१५ रोजी नाशिक शहर व जिल्हा हिंदु संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या बाबतची माहिती संमेलनाच्या सहसंयोजक अ‍ॅड. मीनल वाघ-भोसले यांनी दिली. संमेलनात जवळपास २५ हजार पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक सहभागी होतील. तसेच या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे ३० हजार सभासद नोंदणी केली जाणार असल्याचे अ‍ॅड. वाघ यांनी सांगितले. त्या अंतर्गत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा गौरव, देशभक्तीपर गाणी आदी कार्यक्रमांचा समावेश राहील. हिंदु संमेलनासाठी स्थळ निवडताना सखोल विचार झाल्याचे दिसते. सिंहस्थात साधु-महंत ज्या साधुग्राममध्ये वास्तव्य करतात, त्या तपोवन परिसराची निवड संमेलनासाठी करण्यात आली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवनातील मैदानात जाहीर सभा झाली होती. त्याच मैदानावर विहिंपने हिंदु संमेलनाचे आयोजन केले आहे. विहिंपच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताने तब्बल पाच लाख नवीन सभासद संघटनेशी जोडण्याचा संकल्प केला आहे.
संमेलनातून जिल्हावार हे काम केले जाईल. काँग्रेसच्या सत्ताकाळात काहिशा दडपणाखाली राहिलेल्या विहिंपने सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालविला आहे.