गणेशोत्सव म्हटले की अबाल वृद्धांपासून साऱ्यांच्या उत्साहाला उधाण येते. त्याच अनुषंगाने शहरातील मूर्ती विक्रेत्यांचा उत्साह सध्या शिगेला पोहचला असून जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच पोलीस यंत्रणेची हरकत असताना शांतता क्षेत्रात गाळे उभारण्याचा श्रीगणेशा केला आहे. या वादात महापालिकेने मौन स्वीकारल्याने जिल्हा रुग्णालय व पोलिसांच्या विरोधाची धार बोथट झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून विक्रेता तसेच ग्राहक यांना मध्यवर्ती ठिकाणी राहावे, यासाठी त्र्यंबक रस्त्यावर जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून जलतरण तलावाच्या बाजूने दुतर्फा विक्रेत्यांचे गाळे लागतात. यामुळे गणेशचतुर्थीच्या कित्येक दिवस आधीपासूनच या भागात गजबजाट होण्यास सुरुवात होते. परिणामी, वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. यामुळे अनेकदा जिल्हा रुग्णालयासमोर अपघातही झाले आहेत. दुसरीकडे, जिल्हा रुग्णालय परिसर हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शांतता क्षेत्र आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे गाळे लावू नये, असा स्पष्ट उल्लेख असताना हे नियम धाब्यावर बसवत महापालिका आणि गणेशमूर्ती विक्रेते खुलेआम गाळे थाटतात. गतवर्षी या मुद्दय़ावर महापालिका, रुग्णालय आणि पोलीस यांनी तोडगा काढण्यासाठी समन्वय बैठकीचे आयोजन केले. मात्र विक्रेत्यांची आडमुठी भूमिका तसेच महापालिकेच्या धोरणामुळे पोलीस यंत्रणेला ‘बघ्याची’ भूमिका घ्यावी लागली. मागील वर्षांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात महापालिका व जिल्हा रुग्णालयाच्या बाहेरील आवारात गाळे लावण्यास परवानगी देऊ नये अशी सूचना करणारे पत्र दिले. मात्र या पत्राकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत महापालिकेने नेहमीप्रमाणे मौन बाळगत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दुसरीकडे, रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण, त्यांचे नातेवाईक, कर्मचारी यांना वाहतूक कोंडीसह तेथील गोंगाट सहन करावा लागतो.
गर्दीमुळे साथीचे तसेच संसर्गजन्य आजाराचे विषाणू फैलावण्याचा धोका आहे. या शिवाय रस्त्याच्या दुतर्फा आणि प्रवेशद्वारापासूनच गाळ्याची सुरुवात असल्याने रुग्णवाहिकेतून रुग्णाला आणताना अडचणी येतात. महत्त्वाची बाब म्हणजे विक्रेते गाळे उभारतात, पण ग्राहकांना वाहनतळाची सुविधा करून देत नाहीत. त्यामुळे ही सर्व मंडळी रुग्णालयाच्या आवारात वाहने उभी करून आपली कामे उरकतात. याबाबत रुग्णालय व्यवस्थापन महापालिका आणि पोलिसांना पत्र देणार आहे.

महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश लक्षात घ्यावा
जिल्हा शासकीय रुग्णालयाचे आवार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शांतता क्षेत्र असताना त्या ठिकाणी महापालिकेने केवळ आर्थिक स्वार्थासाठी गाळ्यांना जागा देऊ नये. याबाबत संबंधित विभागाला पत्र पाठविले आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर नाही. महापालिका आपल्या भूमिकेवर कायम राहिल्यास पोलीस तरी काय करणार ?
संदीप दिवाण (पोलीस उपायुक्त)

शेवटी जागा महापालिकेची
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापुढील जागेत मूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलमुळे वाहतूककोंडी, ध्वनिप्रदूषण, वाहनतळासह अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याबाबत पोलीस तसेच महापालिकेला पर्यायी जागा देण्याचे तसेच सहकार्य करावे अशा आशयाचे पत्र दिले जाणार आहे. मात्र शेवटी रस्त्यावरील जागा महापालिकेची आम्ही काय करणार?
– डॉ. एकनाथ माले
(जिल्हा शल्यचिक्तिसक)