‘तिमिरातून तेजाकडे’ जाण्याचा संदेश देणारा दीपोत्सव काही संदेश घेऊन येतो. फटाक्यांची आतशबाजी, फराळाची रेलचेल, रंगाच्या उधळणीने भरलेले अंगण, दिव्यांची आरास या सजावटीने दीपोत्सवाचा रंग अधिकच गहिरा होतो. चारचौघांसारखी अशी दिवाळी सर्वानी साजरी केली. मात्र पिंपळगाव येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धेविरोधात जनजागृतीसाठी सर्वधर्मसमभावाची शिकवण देत घराच्या चार भिंतींऐवजी थेट अमरधाममध्ये दीपोत्सव साजरा केला.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात दीपोत्सव अनोख्या थाटात व उत्साहात साजरा झाला. कोणी घरासमोर रांगोळी काढून, तर कोणी दिव्यांची आरास लावून, तर कोणी फटाक्यांची आतषबाजी करत हा उत्सव साजरा केला. पिंपळगाव येथे मात्र हा उत्सव अमरधाम अर्थात स्मशानभूमीत साजरा झाला. या माध्यमातून डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे विचार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मयतावर अग्निसंस्कार करण्यासाठी जाणे, या एका कर्तव्यापुरते ग्रामस्थ या भागाशी जोडलेले. त्यानंतर हा परिसर आणि आपला काहीच संबंध नाही, अशी सर्वाची भावना. यामुळे त्या जागेला काहीसे उकिरडय़ाचे स्वरूप प्राप्त झाले होते. गावातील काही तरुणांनी एकत्र येत ‘अमरधाम विकास समिती’ची स्थापना केली. समितीच्या माध्यमातून अमरधाम परिसरात ग्राम स्वच्छता अभियान राबवत संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. परिसराला आलेले बकाल स्वरूप घालविण्यासाठी या ठिकाणी विविध प्रकारची झाडे लावत हा संपूर्ण परिसर हिरवळीचा करण्यात आला.
या उपक्रमाचे पुढील पाऊल म्हणून कवी शिरीष गंधे, विकास समितीचे शाम मोरे यांनी येथे सार्वजनिक स्वरूपात उत्सव साजरे करण्याचे ठरवले. श्रद्धा-अंधश्रद्धा यातील अस्पष्ट सीमारेषा पुसत समितीने हिंदू संस्कृतीत महत्त्वपूर्ण मानला जाणारा दीपोत्सव या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या चार वर्षांपासून समितीची कार्यकारिणी या परिसरात आपल्या कुटुंबीयांसमवेत दीपोत्सव साजरा करत आहे. यंदाही अश्विन अमावस्येला म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीमातेचे विधीवत पूजन स्मशानभूमी परिसरातील चौथऱ्यावर करण्यात आले. यानिमित्त संपूर्ण परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. सुवासिनींनी सडा टाकत परिसरात आकर्षक रांगोळ्या काढल्या. बच्चे कंपनीने आई-वडिलांना जमेल तशी मदत केली. आकाश दिव्यांच्या प्रकाशाने या उत्सवाला लखलखती किनार लाभली.
हा दीपोत्सव अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार रुजण्याची सुरुवात असल्याचे मोरे यांनी सांगितले. या माध्यमातून ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांचा श्रद्धांजली वाहण्याचा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या अनोख्या दीपोत्सवाला भेट दिली. यावेळी समितीचे मोरे, सुहास ठाकरे, दिलीवर काजी, चांगदेव भुजबळ, सचिन विंचू, प्रकाश आंबेकर, मधुकर भोर आदी उपस्थित होते.