दोन महिलांना सात दिवसांची पोलीस कोठडी
नाशिक येथे घरकाम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बांधकाम व्यावसायिकाकडून झालेल्या अत्याचार प्रकरणाचे धागेदोरे मनमाडपर्यंत येऊन पोहोचल्याने येथील सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात येथील मनोरम सदन या मुलींच्या अनाथ आश्रमाच्या माजी अधिक्षिका सुमन रणदिवे यांच्यासह उज्ज्वला नागरिक यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शोध पथकाकडे सोपविण्यात आला असून मनमाड येथील या अनाथ आश्रमातून सदर मुलीस परस्पर बांधकाम व्यावसायिकाकडे कामास पाठविण्यात आल्याने आश्रमातही विशेष चौकशी पथकामार्फत तपास सुरू आहे.
नाशिक शहरातील सिटीसेंटर मॉलसमोरील एका बंगल्यात हा प्रकार उघडकीस आला. चार महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीस रणदिवे व त्यांची मैत्रिण उज्ज्वला नागरिक (रा. उषाकिरण सोसायटी, नाशिक) यांनी समोरच राहणाऱ्या पॉल जोसेफ शिरोळे या बांधकाम व्यावसायिकाकडे घरकामासाठी पाठविले. त्याने मुलीवर अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर दोन्ही महिलांनी मुलीला घरातच ठेवले. परंतु संधी मिळताच मुलीने सुटका करून घेत पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी रणदिवे व उज्ज्वलासह पॉलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अजून काही मुलींवर अत्याचार झाले असण्याची तसेच मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दोन्ही संशयित महिलांनी सदर मुलीस नाशिक येथे ठेवण्याचे कारण काय, याविषयी विविध तर्कवितर्क करण्यात येत आहेत. त्यांच्याकडे नेहमी वेगवेगळ्या मुलींना घरकामासाठी ठेवले जात असल्याचे सांगण्यात येते. गुन्हे शोध पथकाकडून मनमाड येथेही तपास सुरू झाला आहे.
सुमन रणदिवे यांना मनोरम सदन मधून गेल्या वर्षीच गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत काढून टाकण्यात आले असल्याने मनोरम सदनशी त्यांचा संबंध नसल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र रणदिवे या येथील सामाजिक संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. तसेच अधिक्षिका या नात्याने एनएफई मिशनतर्फे संचलित या संस्थेतील मुलींशीही काही वर्षांपासून त्यांचा संपर्क असल्याने आणि त्याही संशयित असल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

शिवसेनेच्या नगरसेविका उषा सोळसे यांनी याआधीही रणदिवे यांनी अशा प्रकारचे कृत्य केले आहे काय, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात अजून किती जणी आहेत. प्रतिष्ठीत व्यक्तींचा या टोळीत सहभाग आहे काय यांसह यामागील खरे गुन्हेगार शोधून त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई करावी. या प्रकरणात गावातील काही बडे व्यक्ती तसेच राजकीय व्यक्ती यांचा सहभाग असू शकतो, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. अनाथ आश्रमातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आयटक संलग्न भारतीय महिला फेडरेशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.