डेंग्युबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये असणारा गैरसमज दूर व्हावा, लोकांनी आरोग्याचा मूलमंत्र जपावा यासाठी आरोग्य विभाग युध्द पातळीवर कामाला लागला आहे. शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहीम राबविताना डासांच्या निर्दालनासाठी विविध पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून डेंग्यु डासांची उत्पत्ती ज्या ठिकाणी होते, ती ठिकाणे ठळकपणे निदर्शनास आणण्यासाठी सावधानतेचा इशारा देणारे फलक (स्टिकर्स) लावण्यात येत आहे. आतापर्यंतच्या पाहणीत अशी थोडी थोडकी नव्हे तर, तब्बल ४८,९२९ स्टिकर्स लावण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे, ३० घरात साचलेल्या पाण्यातही एडीस डासांच्या अळ्या आढळून आल्या. शहरात सर्वत्र हे शोधकाम सुरू असले तरी नाशिक पूर्व, पंचवटी आणि नाशिकरोड विभागात विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
ऑक्टोबरपासून डेंग्यु सदृश्य रुग्णांची संख्या वाढू लागली. या आजाराने मरण पावणाऱ्यांची संख्याही या काळात वाढली. डेंग्युमुळे सर्वसामान्यांमध्ये घबराट पसरली असताना आरोग्य विभागाच्या एकुणच कामकाजावर प्रश्न चिन्ह उभे राहिले. या पाश्र्वभूमीवर, आरोग्य विभागाने मरगळ झटकत डेंग्युच्या डासांचा नायनाट करण्यासाठी विविध पध्दतीचा अवलंब केला आहे. या अंतर्गत शहरातील नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, नाशिकरोड, नवीन नाशिक आणि सातपूर विभागात डेंग्यु विषयी प्रबोधन करण्यासाठी विविध फलक लावण्यात आले आहेत. याशिवाय ‘स्टिकर्स’च्या माध्यमातून प्रबोधनावर भर देण्यात आला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने जनजागृती मोहिमेसाठी एक लाखाहून अधिक लहान-मोठय़ा आकारातील ‘स्टिकर्स’ छापली आहेत. त्यात डेंग्युपासुन बचाव कसा करावा, तो कशामुळे होतो याबाबत प्रबोधनपर माहिती देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी डेंग्यु पसरविणाऱ्या एडिस डासांच्या उत्पत्ती होते अर्थात कंटेनर, हौद, कुंड्या खाली ठेवलेल्या थाळी आदी वस्तुंवर हे स्टिकर्स लावण्यात येत आहेत. ही ठिकाणे शोधण्यासाठी या विभागाच्या पथकांनी ७ लाख, ८४ लाख, ७७५ घरांची पाहणी केली. त्या अंतर्गत एडीस डासांच्या अळया शोधून काढणे, त्या ठिकाणी फवारणी करणे आदी कामे कर्मचारी करत आहे. ज्या ठिकाणी कचरा व डासांची उत्पत्ती ठिकाणे निदर्शनास येतात, तिथे लगेचच ‘एडीस डासांची उत्पत्ती ठिकाण’ असे स्टिकर्स चिकटविले जाते. एडीस डासांची उत्पत्ती स्वच्छ घरगुती पाणी साठय़ात होते. या डासांमुळे डेंग्यु, चिकनगुनिया या आजारांचा प्रसार होतो असे सांगत पाण्याचे साठे आठवडय़ातून एकदा घासून-पुसून स्वच्छ करा, असे आवाहनही करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या पाहणीत ४८,९२९ स्टिकर्स लावण्यात आले असून ५६,३२९ स्टिकर्स वितरित करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या पाहणीत ३० घरांमध्ये डेंग्युच्या अळया आढळून आल्या.
दरम्यान, या विशेष मोहिमेत ठिकठिकाणी पडलेली टायर्सही उचलली जात आहे. पंचवटी विभागातून ४० व सिडको येथून १३ टायर्स उचलण्यात आली. नाशिकरोड, पूर्व व पंचवटी भागात डेंग्यु सदृश्य रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. एस. जी. हिरे यांनी सांगितले. यामुळे मोहीम राबविताना या विभागाकडे प्राधान्याने अधिक लक्ष देण्यात आले आहे. नागरिकांनी आपला घर व परिसर डासांच्या उत्पत्तीला पूरक ठरणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.