भारतीय मजदूर संघप्रणित राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेने सजग राहून कर्मचाऱ्यांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेचे माजी महामंत्री विनायक इंदूरकर यांनी केले.
विदर्भ बँक कर्मचारी संघटनेतर्फे भारतीय मजदूर संघाच्या काँग्रेसनगर कार्यालयात राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी भारतीय मजदूर संघाचे विदर्भप्रदेश महामंत्री अशोक भूताड, उपाध्यक्ष राजीव पांडे, महामंत्री प्रकाश सोवनी प्रामुख्याने उपस्थित होते. इंदूरकर म्हणाले, पहिल्या द्विपक्षीय करारात आपली संघटना सहभागी झाली होती. नंतर कम्युनिस्ट पक्षाने दिवं. इंदिरा गांधीचे सरकार तारण्यासाठी मदत केली. त्याच्या बदल्यात आमच्याशीच करार करावा, अशी अट मान्य करून घेतली. तेव्हा राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेने या करारातील त्रुटीकडे देशातील कामगारांचे लक्ष वेधून जागृती केली. यानंतर हा करार रद्द करून नवीन करार करण्यास भाग पाडले. यानंतर अंदाधुंद संगणकीकरणाला विरोध केल्यामुळे आयबीएनने करारावर स्वाक्षऱ्या करण्यास मनाई केली. तेव्हा याची तीव्रता कमी केली. त्यामुळे आज जेवढे कर्मचारी दिसताहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने कर्मचाऱ्यांची संख्या कमी राहिली असती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सध्या दहाव्या कराराची चर्चा सुरू आहे. आय.बी.ए.ची खेळी लक्षात घेऊन भामसंप्रणित राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेने सजग राहून काम करणे आवश्यक आहे. ही संघटना व्यवस्थापन आणि कामगार या दोन्हींचे हित सांभाळतील, अशी अपेक्षा व्यक्त करून २५ ते २८ फेब्रुवारीला होणाऱ्या आंदोलनात जास्तीत जास्त कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही इंदूरकर यांनी याप्रसंगी केले. सोवनी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. राजीव पांडे यांनी आभार मानले. याप्रसंगी विनायक जोशी, अशोक जुननकर, अर्चना सोवनी, नंदा तपासे, सुरेश चौधरी, नितीन बोरवणकर, रवी सहस्त्रबुद्धे, यांच्यासह मोठय़ा संख्येने कामगार उपस्थित होते.