येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय येथील विश्रामगृहात आयोजित पक्षाच्या शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे हे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाने राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडून विधानसभेसाठी देवळाली (राखीव), पश्चिम नाशिक, मुंबई, ठाणे व कोकण, विदर्भ, मराठवाडा या विभागात प्रत्येकी दोन, पश्चिम महाराष्ट्र एक तसेच विधान परिषदेची एक जागा देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाने राष्ट्रवादीला  आपल्या परीने मदत केल्याचे यावेळी सांगण्यात आले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मागे भीमशक्ती उभी करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविल्याने देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना एकहाती सत्ता देताच मोदी यांनी रेल्वे, पेट्रोल, डिझेल आदींच्या किंमतीत वाढ करून जानतेचा विश्वासघात केल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आता उरलेला नसल्याचा दावा करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख नारायण गायकवाड हे होते. राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय पगारे, जितींदरसिंग बिंद्रा आदी उपस्थित होते.