आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहत असलेल्या ग्रामीण पनवेलचा विदारक चेहरा सिद्धीकरवले गावातील बोअरवेलच्या पाण्याने उघड केला आहे. विमानतळामुळे येथील जमिनीच्या किमतींनी गगनभरारी घेतली तरी येथील सिद्धीकरवले गावातील दोन हजार ग्रामस्थ अजूनही बोअरवेलच्या पाण्यावर आपही तहान भागवत आहेत. बोअरवेलव्यतिरिक्त इतर जलस्रोतातून मिळणारे दूषित पाण्याचा वापरही येथे केला जात असल्याने साथीचे आजारांचा सामना येथील ग्रामस्थांना करावा लागत आहे.
सिद्धीकरवले गावात इतर गावांसारखीच सरकारी यंत्रणा कार्यरत आहे. मात्र या सरकारी यंत्रणेकडे ग्रामस्थांसाठी जलवाहिनी नाही. गेल्या अनेक वर्षांपासून गावातील दोन विहिरी या ग्रामस्थांची तहान भागवत आहे. मात्र दर वर्षी उन्हाळ्यात या विहिरी तळ गाठतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या चार महिन्यांत ग्रामस्थांना पाण्यासाठी दूर अंतरावर पायपीट करावी लागते. पर्यायी व्यवस्था म्हणून काहींनी येथे बोअरवेल खोदल्या आहेत. सुमारे पाचशे फूट जमिनीखाली खोल गेल्यावर या बोअरवेलला पाणी लागते. यासाठी सुमारे ८० हजार रुपये खर्च होतो. ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे तो हा खर्च करतात. परंतु ज्यांची नाही अशांनी कर्ज काढून बोअरवेल काढल्या आहेत. अशा ६० बोअरवेल या गावाची सध्या तहान भागवत आहे. सिद्धीकरवले गावासारखीच तुर्भे व पिसार्वे येथील ग्रामस्थ बोअरवेलचे पाणी पीत आहेत, परंतु बोअरवेलच्या पाण्यावर जगणाऱ्यांना सध्या उपलब्ध दूषित पाण्याच्या समस्येलाही तोंड द्यावे लागत असल्याचे गावातील ग्रामस्थ सुनील पाटील यांनी सांगितले. गावातील दोन विहिरींमधील पाण्यात क्लोरिन टाकून ते स्वच्छ करून ते पाणी वापरले जाते. दुसरीकडे गावापासून काही मीटर अंतरावर असलेली गावाची नदी व इतर जलस्रोताचाही वापर होत असतो, परंतु येथील कारखान्यांतील सांडपाण्यामुळे हे पाणीही दूषित होत आहे. याबाबतची तक्रार गावातील ग्रामपंचायत सदस्य गोपीनाथ पाटील व योगेंद्र पाटील यांच्यासह इतर ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली. मात्र या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

’ उपलब्ध दूषित पाण्याच्या वापरामुळे साथीचे आजार
’ जलवाहिनीचे काम ठप्प ’ पाण्याखाली शेवाळ

रुग्णांची संख्या अधिक
येथील डॉ. प्रताप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्यामुळे गावात गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. गावात आजही ताप, सर्दी व खोकला या साथीच्या आजाराशी संलग्न रुग्ण दवाखान्यात दिसतात, असे त्यांनी सांगितले. वायुप्रदूषणामुळे येथील बालकांना सर्दी, खोकल्याचे प्रमाण दहा रुग्णांमागे तीन असा आहे.

नदीच्या पाण्याखाली शेवाळ
सोमवारी सिद्धीकरवले या गावातील सुनील पाटील व योगेंद्र पाटील यांनी गावालगतच्या नदीत रंगीत पाणी जात असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली. या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी आलेले अधिकारी नंदकुमार लोमते व एस. बी. पाटील यांनी संबंधित पाण्याचे नमुने घेतले असता तपासणीत हे पाणी दूषित नसल्याचे सांगितले. या पाण्याखाली शेवाळ जमल्यामुळे त्याचा रंग लालसर असल्याचे या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सांगितले. नमुने घेतलेल्या पाण्यात काही दूषित पाण्याचा अंश आढळल्यास संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करू, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सिद्धीकरवले ग्रामस्थांनी काही महिन्यांअगोदर रामके ग्रुपच्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमधून थेट नदीत दूषित पाणी सोडताना पकडले होते. त्यावेळी मुं.वे.मॅ. कंपनीच्या अधिकाऱ्याला ग्रामस्थांनी काळे फासले होते. एमपीसीबीने त्या वेळी मुं.वे.मॅ. कंपनीवर कायदेशीर कारवाई केली होती, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

जलवाहिनीचे काम ठप्प
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या गावाला एमआयडीसीने पाणीपुरवठा करावा यासाठी लेखी पत्रव्यवहार केला. या पत्रव्यवहाराला एमआयडीसीने उपलब्ध पाणीसाठय़ात ग्रामस्थांना पाणी देऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी गावानजीकच्या कंपनीकडे पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकण्याची मागणी केली. या जलवाहिनी देण्याचे संबंधित कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले. त्या जलवाहिनी टाकण्याच्या खोदकामाचे भूमिपूजनही करण्यात आले, परंतु सध्या काम ठप्प झाले आहे.