पालिका निवडणूक तोंडावर आल्याने गेली पाच वर्षे न केलेल्या नागरी कामांच्या शेकडो फाइल्स नवीन आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहेत. या फाइल्सची संख्या ८०० ते ९०० फाइल्सपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फाइल्सच्या मंजुरीवरच नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून असल्याने त्या मंजूर करण्यासाठी नगरसेवकांच्या जीवाची ओढाताण सुरू झाली आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी मुंबईत चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे घाबरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पालिका मुख्यालयात सकाळपासून संध्याकाळपर्यंत तळ ठोकून बसत असल्याचे दिसून येते. ही निवडणूक वैयक्तिक पातळीवर जास्त प्रमाणात लढली जात असल्याने, सर्वपक्षीय नगरसेवकांची सकाळ आता पालिका मुख्यालयात सुरू होत आहे. काही नगरसेवक अधिकारी येण्यापूर्वी हजेरी लावत आहेत. यात काही नगरसेवक शिपायाचे कामदेखील करताना दिसतात. नागरी कामाच्या फाइल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर नेण्यासाठी शिपाई असताना, त्याची वाट न पाहता हे नगरसेवक त्या फाइल्स काखेत मारून फिरत असल्याचे अनेक वेळा दिसून येते. आलिशान मुख्यालयात फाइल्स घेऊन फिरणारे नगरसेवक पाहिले, की त्यांची कीव केल्याशिवाय अनेकांना राहावत नाही, पण नागरी कामांचा पाठपुरावा न केल्यास कामे होणार नाहीत, असा या शिपाईगिरीमागे नगरसेवकांचा युक्तिवाद आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीची आचारसंहिता आता एक महिन्याच्या तोंडावर आल्याने, आपल्या प्रभागातील नागरी कामे करून घेण्यासाठी नगरसेवकांची लगबग सुरू झाली आहे. प्रभागातील छोटय़ा-मोठय़ा कामांवर या विद्यमान नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून आहे. या भवितव्याबरोबरच कामातून मिळणाऱ्या लक्ष्मीदर्शनाने निवडणुकीचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे ही कामे करण्यासाठी ते अधिकाऱ्यांच्या दालनात तळ ठोकून बसत आहेत. जुने आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची बदली अचानक झाल्याने त्यांच्या जागी आलेले दिनेश वाघमारे यांच्यावर अनेक नागरी कामांच्या फाइल्सना मंजुरी देण्याची जबाबदारी आली आहे. हे आयुक्त प्रत्येक फाइलचा बारकाईने अभ्यास करून तिला मंजुरी देत असल्याने, या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. तोपर्यंत नगरसेवकांचा जीव कासावीस झाला आहे. आयुक्तांनी २५ लाखांपर्यंत खर्चाच्या कामांची मंजुरी विभाग अधिकाऱ्यांवर सोपविण्याचे सुतोवाच केले आहे, मात्र अद्याप त्याचे परिपत्रक काढण्यात आलेले नाही. त्यामुळे आयुक्तांकडे फाइल्स पाठविल्या जात आहेत. यापूर्वीच्या सर्व आयुक्तांनी सर्व फाइल्स आयुक्त दर्शनासाठी आणण्याचे आदेश दिले होते. एका नगरसेवकाच्या प्रभागातील सरासरी १० फाइल्स मंजुरीविना पालिकेत आहेत. त्यामुळे या हिशेबाने नागरी कामाच्या त्यात एक-दोन लाखांच्या कामांचा देखील समावेश आहे. अशा ८०० ते ९०० फाइल्स मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. आयुक्त कार्यालयाने मात्र अशा ६० फाइल्स असल्याचे सांगितले.