नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता अभियानाचे पुरस्कार मिळवून शहराच्या लौकिकतेत भर घातली असताना दुसरीकडे मात्र ऐरोली, कोपरखरणे, घणसोली, परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या ठिकाणी लाखो रुपये खर्चून पालिकेने बसवलेल्या कचरा पेटय़ा गायब झाल्याने नागरिकांना कोणताही पर्याय नसल्याने थेट रस्त्यावरच कचरा टाकावा लागत आहे.
नवी मुंबईला अधिक स्वच्छ आणि गतिमान करण्याच्या वल्गना राजकीय नेते, पालिका अधिकारी करून घेत आहेत. पंरतु पालिकेचे हे पितळ आता विभाग अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे उघडे पडले आहे. ऐरोली-घणसोली, कोपरखरणे परिसरात ठिक-ठिकाणी चौकात कचरा टाकण्यासाठी जागा नियोजित करण्यात आली आहे. पंरतु या ठिकाणी मागील काही दिवसांपासून असणाऱ्या कचरापेटय़ा गायब झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढिग साचले आहेत. रस्त्यावर कचऱ्याचे ढिग साचल्याने दुचाकी वाहनचालक आणि पादचाऱ्यांना नाक मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. यातच कचरा नियमितपणे उचलणे अनिवार्य असताना दोन ते तीन दिवस हा कचरा तसेच पडून असल्याने नागरिकांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे. या कचरापेटय़ा कुठे गेल्या असा सवाल सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे. यांसदर्भात घनकचरा व्यवस्थापन बाबासाहेब राजळे यांच्याशी संपर्क साधला असता नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभाग अधिकाऱ्यांना सूचना देऊन याबाबतची माहिती घेतली जाईल. तसेच साचलेला कचरा स्वच्छ करण्याची मोहीम तातडीने हाती घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.