नवी मुंबई पालिकेची पाचवी निवडणूक एप्रिल महिन्याच्या चौथ्या आठवडय़ात होणार आहे. शहरी आणि ग्रामीण भाग समावेश असलेल्या प्रभागांत उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. शहरी भागाचा जास्त अंतर्भाव असलेल्या प्रभागात ग्रामीण भागातील उमेदवाराच्या विरोधात ग्रामीण मतदार मतदान करणार असून हीच स्थिती ग्रामीण भागातील उमेदवाराची शहरी भागात होणार आहे. नवी मुंबईत शहरी ६५, ग्रामीण २९ आणि झोपडपट्टीत १७ प्रभाग आहेत. 

राज्य निवडणूक आयोगाने सव्वाअकरा लाख लोकसंख्येला नजरेसमोर ठेवून आठ लाख १५ हजार मतदारांचे १११ प्रभाग तयार केले आहेत. ही प्रभाग रचना पहिल्यांदाच गुगल अर्थचा आधार घेऊन करण्यात आल्याने यात बरीच उलथापालथ झाली आहे. त्यामुळे अनेक प्रभागांत शहरी व ग्रामीण भागांची सरमिसळ झाली आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण मतदारांत उमेदवारांचीदेखील विभागणी झाली आहे. नवी मुंबईची रचनाच मुळी २९ गावांना लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींवर झालेली आहे. या २९ गावांसाठी २९ प्रभाग तयार झाले आहेत. पण त्यांत शहरी भागांचा अंतर्भाव आहे.
प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या साडेबारा टक्केयोजनेतील भूखंडावर उंच इमारती उभ्या राहिल्याने त्यांत राहण्यास आलेले रहिवासी हे परगावातील तसेच परप्रांतीय आहेत. त्यामुळे भौगोलिकदृष्टय़ा गाव आणि शहरे एकत्र झाल्याचे दिसून येते पण ही बाब ग्रामीण व शहरी भागांतील मतदारांना मान्य नाही. काही शहरी भागात ग्रामीण भागातील वीस ते तीस टक्के भाग जोडण्यात आला आहे, तर काही ग्रामीण प्रभागांत शहरांचा थोडासा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. त्या ठिकाणी काही पक्षांनी गावातील कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली आहे. ती शहरी भागातील कार्यकर्त्यांना आणि मतदारांना मान्य नाही. त्यांनी बंडाचा झेंडा उभारण्याचे ठरविले असून, कमी मतदारसंख्या असलेल्या गावातील उमेदवार का सहन करायचा, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शहरी उमेदवार द्या, अशी या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यात शहरी भागातील उमेदवार दिल्यास एखाद्या पक्षाने ग्रामीण भागातील उमेदवार उभा केला असेल तर सर्वपक्षीय मतभेद बाजूला सारून गावातील उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निश्चय केला जात आहे.
या सरमिसळीमुळे मतदार आणि उमेदवार यांच्यात प्रांतीय दरी वाढू लागली आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शहरी आणि ग्रामीण दरी वाढल्याचे एक उदाहरण नवी मुंबईत यापूर्वी घडले असून ऐन होळीच्या दिवशी घणसोली ग्रामीण व शहरी भागात दंगल घडली होती. त्याला नंतर माथाडी व ग्रामस्थ दंगलीचे स्वरूप दिले होते, पण त्यामागे शहर आणि गावामधील रहिवाशांच्यात निर्माण झालेली मानसिक दरी हे कारण होते अशी चर्चा आहे.