बेलापूर येथील पालिकेच्या आलिशान मुख्यालयातील पाचव्या मजल्यावरील सभागृहात बसण्याचा मान कोणाला मिळणार याचे उत्तर मतदार उद्या देणार आहेत. नवी मुंबई पालिकेच्या निवडणूक मैदानात उतरलेले ५६८ उमेदवार आणि उमेदवार नसलेले पण स्वत:ची राजकीय कारकीर्द पणाला लागलेले राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक, त्यांचे आमदार सुपूत्र संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार मंदा म्हात्रे, संजय केळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपनेते विजय नाहटा, यांच्यासह डझनभर आजी माजी नगरसेवकांचे भवितव्य मतदार उद्या मतपेटीत बंद करतील.
एकवेळ लोकसभा आणि दोन वेळा विधानसभा लढवून पराभव पदरी पडलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले आता पालिका निवडणुकीला उभे राहिले असून प्रभाग क्रमांक सातमध्ये त्यांची लुटपुटीची लढाई राष्ट्रवादीच्या भास्कर मोरे यांच्याबरोबर होणार आहे. चौगुले यांचा हा प्रभाग बालेकिल्ला मानला जात आहे. याशिवाय चौगुले यांच्यावर आणखी सहा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आहे. त्यांची उमेदवारी चौगुले यांच्या आग्रहाखातर देण्यात आली असून यात माजी नगरसेवक जगदीश गवते असून दिघा भागातील गवते दाम्पत्याचे भवितव्य बुधवारी ठरणार आहे. दिघा भागाचे पूर्वीचे जमीनदार असलेले सहा गवते या भागात उभे आहेत. त्यानंतर मावळत्या सभागृहात शेवटचे सभागृह नेते म्हणून राहिलेले अनंत सुतार स्वत:चा प्रभाग पत्नीसाठी सोडून दुसऱ्या प्रभागात नशीब आजमावयला गेले आहेत. त्यांना विरोधकांचा तर विरोध आहेच, पण दुसऱ्याच्या प्रभागात घुसखोरी केल्याने राष्ट्रवादीतूनच विरोध असल्याने त्यांचे काय होणार याची उत्सुकता उद्या पेटीबंद होणार आहे. ऐनवेळी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्या निष्ठा पायदळी तुडवून शिवबंधन बांधणारे पालिकेतील पहिल्या अतिक्रमण घोटाळ्यातील आरोपी एम. के. मढवी आणि त्यांची पत्नी, मुलगा यांना शिवसैनिकांनी स्वीकारले की नाही ते स्पष्ट होणार आहे. आमदार संदीप नाईक यांनी ह्य़ा तीन लढती प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत. आमदार नाईक यांच्यावरील नाराजीमुळे आपण पक्ष सोडल्याचे मढवी यांनी सांगितले आहे. माजी उपमहापौर व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय रमाकांत म्हात्रे यांची पत्नी म्हणजे एकाअर्थाने ते स्वत: निवडणुकीत उभे असून त्यांची गावात किती वट आहे ते कळणार आहे. घणसोलीतील काका-पुतण्याच्या लढतीकडे सर्व नवी मुंबईचे लक्ष लागून राहिले आहे. काका नगरसेवक संजय पाटील व पुतण्या प्रशांत पाटील यांची लढत अटीतटीची होणार असून मतदारांचा कौल स्पष्ट होणार आहे. कोपरखैरणेतील चतुर नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे आणि प्रत्येक निवडणुकीत नवीन पक्षाबरोबर घरोबा करणारे शिवराम पाटील यांचेही भवितव्य स्पष्ट होणार आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे नगरसेवक केशव म्हात्रे यांनी आव्हान तयार केले आहे. याशिवाय राष्ट्रवादीतील असंतोषाचे जनक आणि एफएसआयफेम वाशीतील किशोर पाटकर यांची थेट लढत राष्ट्रवादीच्या अनिल हेलेकर यांच्याबरोबर आहे. त्याचा निकाल स्पष्ट होणार आहे. शिवसेनेचे बेलापूर संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे यांचे व त्यांच्या सुनेचे भवितव्य या निवडणुकीत मतदारांना कळणार आहे. सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत, त्यांची पत्नी इंदुमती भगत, त्यांची विवाहित मुलगी पूनम पाटील यांचीही राजकीय कारकीर्द या निवडणुकीमुळे लोकांना समजणार आहे. याशिवाय नेरुळमधील हॅट्ट्रिक किंग नगरसेवक संतोष शेट्टी, त्यांची पत्नी, शेकापवर विश्वास व्यक्त करणारे नगरसेवक भरत जाधव, विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, डॉ. जयाजी नाथ, दशरथ भगत यांची भावजय, पत्नी, स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, त्यांची पत्नी राधा, आणि त्यांच्या सांगण्यावरून उमेदवारी दिलेले तीन नगरसेवकांचे भवितव्य उद्या होणाऱ्या मतदानानंतर मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांचा जीव टांगणीला लागणार असून गुरुवारी दुपापर्यंत हे चित्र स्पष्ट होणार आहे.