राज्य शासनाने नियोजनबद्ध शहर म्हणून वसविण्याचा प्रयत्न केलेल्या नवी मुंबई या माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्या अंगणात नाईक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे, उपनेते, विजय नाहटा, भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे, काँग्रेसचे दशरथ भगत या विरोधकांच्या लिमिटेड कंपनीने तलवार उपसली आहे. नाईकांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्व विरोधक सत्तेचा फुटबॉल गोल करण्याच्या उद्देशाने गोलकिपरकडे टोलवत नेत असून तेथे उभ्या असलेल्या नाईक यांना हा गोल होणार नाही यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. विरोधकांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत केलेला घराणेशाहीचा प्रचार यावेळी मागे पडला आहे. नाईकांवर भ्रष्टाचाराचे आरोप हे तिनही पक्ष जोरदारपणे करीत आहेत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कळस चढवताना भ्रष्टाचाराचे मूर्तिमंत उदाहारण म्हणजे नवी मुंबई पालिका असे म्हटले आहे.
नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या अंतिम टप्पा आता जवळ आला असून बुधवारी मतदान होणार आहे. सोमवारी संध्याकाळी प्रचार थंडावला. गुरुवारी या मतदानाचा निकाल स्पष्ट होणार आहे. पालिकेत गेली वीस वर्षे असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यासाठी विरोधक पुढे सरसावले आहेत. ही सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा नाईकांची असल्याचा समाचार घेतला जात असून त्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाव देण्यात आले आहे. पालिकेतील भ्रष्टाचार हा विरोधकांचा आता प्रमुख मुद्दा झाला आहे. त्या विरोधात पहिली तोफ शिवसेनेने डागली आहे. कोपरखैरणे येथील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला स्थानिक नेत्यांनी पालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. नाईक यांनी आपल्या खैरणे येथील व्हाइट हाऊस नावाच्या कार्यालयात जाण्यासाठी करोडो रुपये खर्च करून यू टर्नचा उड्डाणपूल बांधला आहे.
या पुलावर झालेला खर्च पाणी, गटार यांसारख्या सुविधांवर खर्च केला असता तर नवी मुंबईकरांनी आशीर्वाद दिले असते, असा आरोप पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. या नाईक कुटुंबाने नवी मुंबई पालिका लुटून खाल्ली असून साधी शौचालयाची बांधकामेदेखील कार्यकर्त्यांना दिलेली नाहीत,असे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे पालिका निवडणुकीत नाईकांना आता व्हाइट वॉश देऊन टाका, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर पालिकेत चार वर्षे आयुक्त राहिलेल्या नाहटा यांनी आरोपांची लाखोली वाहली.
मी स्वत: पालिकेत काम केल्याने यांच्या भ्रष्टाचाराची सर्व कुऱ्हाणे चांगलीच अवगत असल्याचे सांगून त्यांनी सत्ताधारी फाइव्ह पर्सन्ट टक्केवारी घेत असल्याचा आरोप केला. मंदा म्हात्रे यांनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर नाईकांचा पंचनामा केला. कळवा बेलापूर बँक कोणी बुडवली, मुरबाड येथील जमीन कोणी हडप केली. काळू नदीवर कोणी बेकायदेशीर धरण बांधले, अशा प्रश्नांची सरबत्ती करताना या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही ती तात्काळ मान्य करताना या सर्व घोटाळ्यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
शिवसेना-भाजपा या विरोधक पक्षांबरोबरच मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसनेही निशाना साधला असून रस्ता साफसफाई करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मशीनच्या खरेदी व कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे दशरथ भगत यांनी वाशी येथील भावे नाटय़गृहात केला. या सर्व आरोपांचा सामना नाईक यांना एकटय़ाला करावा लागत असून त्यांचा बाजूने भरभक्कम असा नेता रिंगणात उतरलेला नाही.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व दिलीप वळसे पाटील यांनी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईचा विकास झाल्याचा दावा केला. एका वृत्तवाहिनीवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने नाईक यांनी आमदार म्हात्रे यांना न्यायालयात खेचण्याची तयारी सुरू केली असून २५ कोटींचा अवमान दावा ठोकला आहे. त्यानंतर तरी म्हात्रे आरोप करणार नाहीत असा कयास असलेल्या नाईक यांचा अंदाज रविवारी चुकला असून म्हात्रे यांनी दुसरे नवीन आरोप केले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार असून नाईक यांच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात शिवसेना-भाजप काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची लिमिटेड कंपनी असा दोन दिवस सामना रंगणार आहे.