नागरिकांचे मित्र बना, त्यांच्याशी सौजन्याने वागा, अशा प्रकाराचे जाहीर पत्रक काढून नवी मुंबई पोलिसांना नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी समज देणारे आयुक्त के. एल. प्रसाद यांच्या आदेशाला येथील पोलीस कसा हरताळ फासतात, याचे एक ठसठशीत उदाहरण समोर आले असून बुधवारी पहाटे ‘लोकसत्ता’ घरोघरी पोहोचविण्यास हातभार लावणाऱ्या एका वाहनचालकाला रबाळे पोलीस ठाण्यातील चार पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. काच न उघडणाऱ्या या वाहनचालकाच्या गाडीच्या समोरील काचेचा या पोलिसांनी हाताच्या बुक्याने व दांडक्याने पार चक्काचूर करताना आपल्या दबंगगिरीचा उत्तम नुमना दाखविला आहे.
ऐरोली सेक्टर-२० येथील ‘आकाश सदन गृहसंकुला’त राहणारा अंकुश हनुमंत मोलावडे हा तरुण दररोज पहाटे तीन वाजता आपल्या स्वत:च्या बोलेरो पिकअप वाहनाने महापे येथील ‘लोकसत्ता’ च्या छपाईखान्यातून अंक घेऊन नवी मुंबईतील वृतपत्र विक्रेत्यांकडे पोहोचविण्याचे काम करतो. नेहमीप्रमाणे तो बुधवारी पहाटे साडेतीन वाजता गाडीजवळ आला. गाडी घेऊन तो निघाला असताना समोर असलेल्या पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. हे पोलीस साध्या वेशात होते. खासगी गाडीतून गस्त घालीत होते. पोलीस असल्याचा बहाणा करून लुटण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याने हय़ा तरुणाने आपली गाडी थांबविली नाही. उलट लुटारू आलेले बघून त्याने गाडी मदतीसाठी आपल्या सोसायटीत घुसवली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळच त्याची गाडी थांबवून काचा खाली करण्यास सांगितले. त्या खाली न केल्याने एका कॉन्स्टेबलने या तरुणाच्या गाडीसमोरील काचेचा प्रथम हाताने व नंतर दांडक्याने चक्काचूर केला. त्यानंतर या तरुणाला बाहेर खेचून बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार घरातून पाहणारे गणपत कोळेकर या ज्येष्ठ नागरिकाने एक काठी घेऊन इमारतीच्या खाली धाव घेतली. त्यांना हे पोलीस चोर वाटले. ते आरडाओरड करीत पोलिसांना बोलावण्याचे आवाहन दुसऱ्या शेजाऱ्यांना करीत होते. त्या वेळी या दबंग पोलिसांनी ‘आम्हीच पोलीस’ असल्याचे सांगितले.
इतक्या पहाटे पोलिसांच्या तमाशाने जागे झालेले अनेक रहिवासी पोलिसांची ही दबंगगिरी खिडकीतून बघत होते. पोलीस आणि तरुणाच्या या भांडणात भेदरलेल्या तरुणाला गाडीतून खेचून काढताना गाडीचा रिव्हर्स गिअर पडून ती मागे आली. त्यात या पोलिसांच्या गाडीला धक्का बसला आणि त्यांच्या गाडीच्या दरवाजाचे नुकसान झाले. सोसायटीतील सर्व रहिवासी एव्हाना जागे झाल्याचे बघितल्यानंतर प्रकरण अंगाशी येईल, असे वाटल्याने या पोलिसांनी अंकुशला रबाळे पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी आपल्या खासगी गाडीला ठोकर दिल्याने अंकुशच्या विरोधात अपघाताची तक्रार दाखल करून त्याला पहाटे सात वाजता घरी जाऊ दिले गेले. त्यानंतर आपल्या खासगी वाहनाचे नुकसान झाले म्हणून या तरुणाकडून नऊ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे समजते. पोलिसांच्या या दबंगगिरीचे प्रदर्शन कोण करीत होते याची चौकशी केली असता हे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कोपरकर, संजय म्हात्रे, पवार आणि काशिद हे कॉन्स्टेबल असल्याची माहिती उपलब्ध झाली. नवी मुंबई पोलीस दलात मध्यंतरी सुमारे एक हजार नवीन पोलीस भरती झाली आहे. हे तरुण पोलीस केवळ दबंगगिरी करण्यास पोलीस दलात आल्याचे अनेक वेळा दिसून येते. अ‍ॅड्राइड मोबाइलला कवटाळून बसणे, त्याच्यावर चॅटिंग करीत बसणे, पोलीस गणवेश घालण्यास लाज वाटणे, मोटारसायकलवर धूम स्टाइल करणे, हेल्मेट कधीही न वापरणे असे सर्व प्रकार या नवीन पोलिसांच्याबाबतीत सर्रास घडताना दिसतात, असे काही पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या भाईगिरीचा फटका बुधवारी एका होतकरू, मेहनती, आणि काबाडकष्ट करणाऱ्या तरुणाला बसला.

बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांची ही वागणूक योग्य नाही. त्यांनी त्या तरुणाच्या गाडीची मोडतोड करायला नको हवी होती. पोलिसांचे ओळखपत्र दाखवून त्यांना कारवाई करता आली असती. पोलिसांनी अपघाताची नोंद पोलीस डायरीत केलेली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
गोरख गोजरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रबाळे पोलीस ठाणे</strong>