मदतनीसचा अभाव, चालकाची गणवेशला सुट्टी, सीट बेल्टचा कंटाळा, जादा विद्यार्थी, नादुरुस्त वाहने, गायब झालेले सिग्नल बल्ब, कर्णकर्कश हॉर्नचे आवाज, दरवाज्यातील दांडय़ाला दांडी, क्लीनरची रजा आणि पत्ता नसलेले परवाना व कागदपत्र अशा २४५ शाळा बसेसवर नवी मुंबई वाहतूक विभागाने गुरुवारी कारवाईचे हत्यार उगारले. नवी मुंबई, पनवेल, कळंबोली भागांतील ५०० शाळा बसेस, व्हॅन, रिक्षा यांची वाहतूक पोलिसांनी गेली दोन दिवस झाडाझडती घेतली. वाहन चालविण्याचा परवाना व परमिट संपलेल्या बसेसना न्यायालयाचा रस्ता दाखविला जाणार असून त्यांच्यावर चार्जशीट दाखल केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या शाळा विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेमुळे अनेक विद्यार्थी यापूर्वी संकटात सापडले आहेत. मुबंईत काही विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे न्यायालयाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस, छोटय़ा व्हॅन, रिक्षा यांना काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत, पण त्याची सर्रास पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येते. न्यायालय किंवा पोलिसांनी कारवाई केल्यानंतर काही दिवस सुतासारखे सरळ होणारी ही वाहने काही दिवसांतच आपल्या जुन्या सवयीसह पूर्वपदावर येण्यास मोकळे होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी गेले दोन दिवस खासकरून या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस, व्हॅन यांच्याकडे मोर्चा वळविला. त्यासाठी ऐरोली, वाशी, नेरुळ, सीबीडी, खारघर, पनवेल, कळंबोली येथील ५०० शाळा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात वाहनचालकाने सीट बेल्ट न लावणे, गणवेश न घालणे, बॅच न लावणे, महिला मदतनीस न ठेवणे, वाहनांच्या सिग्नल यंत्रणा कुचकामी असणे, क्लीनरचा गाडीत पत्ता नसणे, वाहनाच्या हॉर्नचे कर्णकर्कश आवाज ऐकायला मिळणे यांसारख्या सुविधांची कमतरता असणाऱ्या २४५ वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यातील १४५ वाहनांच्या चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना व परमिट नसल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर ठाकूर यांनी सांगितले. विद्यार्थी वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी यासाठी लवकरच पालक, चालक, मालक आणि शिक्षक यांची एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असून विद्यार्थी वाहतुकीबद्दल या घटकांचे पुन्हा प्रबोधन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.