राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी ७२ मतदारसंघांत निर्णायक भूमिका बजावणाऱ्या व समुद्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या कोळी समाजाचे विद्यमान केंद्रबिदू नवी मुंबईतील तळवली गाव झाले असून सोमवारी या गावाच्या वेशीवर असलेले कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्या घरी कोळी समाजाच्या हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. ऐरोली मतदारसंघात इच्छुक असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या ठिकाणी भेट दिल्याचे समजते. कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी तीन जागा देणाऱ्या पक्षाला कोळी समाज यावेळी एकमुखी पाठिंबा देणार आहे. त्या संदर्भात सर्व पक्षांशी चर्चा सुरू आहे. समुद्राचा राजा असणारा राज्यात कोळी समाज अनेक ठिकाणी विखुरला आहे. कोळी समाजाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून ही संख्या एक कोटीपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील १८ लोकसभा आणि ७२ विधानसभा मतदारसंघांत कोळी समाज निर्णायक भूमिका बजावत असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. कोळी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महासंघाने आंदोलन सुरू केले असून मागील महिन्यात मुंबईतील सोमय्या मैदानात झालेल्या समाजाच्या जाहीर सभेला मोठा जनसमुदाय लोटला होता. हा जनसमुदाय भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी याचि देही याचि डोळा पाहिला आहे.
तेव्हा या समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन या दोन्ही नेत्यांनी महासंघाच्या नेत्यांना दिले आहे. त्यामुळे महासंघाचा उत्साह वाढला असून सोमवारी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेनेचे खासदार राजन विचारे, आमदार संदीप नाईक, जिल्हाप्रमुख विजय चौगुले, युवा नेते वैभव नाईक आणि शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांच्यासह गुजरातमधील समाजाचे एक खासदार यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे महासंघाचे प्रस्थ वाढल्याचे स्पष्ट दिसून येत होते. भाजपचे अध्यक्ष फडणवीस तसेच शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत या संघाच्या नेत्यांनी ठाणे, चोपडा आणि सोलापूर येथे तीन जागांची मागणी केल्याचे समजते. समाजात निवडून येणारे अनेक नेते असून त्यांना जिंकून येणाऱ्या जागांसाठी उमेदवारी दिल्यास संघाचे प्रश्न सोडविणे शक्य होईल असे पाटील यांनी स्पष्ट केले.